
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/मुंबई : आंध्रातील तिरुपती-तिरुमल्ला प्रशासन महाराष्ट्रातील वाहनांमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या आणि वर लावलेले स्टीकर्स जोर जबरदस्तीने काढून टाकत असतील तर मात्र आंध्र सरकारची एकही गाडी महाराष्ट्रात फिरु देणार नाही, किंवा जबरीने आणण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर मात्र त्या गाड्या पकडून त्यांचा चुराडा केला जाईल, असा इशारा कळमनूरीचे आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे.
आ. संतोष बांगर हे पूरते संतापलेले आहेत. त्यांनी माध्यमांशी बोलताना आज मुंबईतून राग व्यक्त करीत पुढे असेही सांगितले आहे की, मी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी सलग दोन वेळा चर्चा केली आहे. आंध्रातील चेकपोस्ट वरील प्रशासनाचा वाढीस लागलेला मस्तवालपणा जिरवायचा असेल तर त्यांच्या गाड्यांचा चकनाचूर करणे हाच एकमेव पर्याय आहे आणि तो मी करणारच, असे निक्षून सांगितले आहे अन्यथा तुम्ही आंध्राच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या अशी विनंतीही केल्याचेही बांगर म्हणाले आहेत. सात आठ दिवस वाट बघू, त्यांच्या लेवलवर ते काय करतात ते, अन्यथा मी माझे काम करणारच, असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रासह संपूर्ण देशात व जगातही मान-सन्मान असलेले छत्रपती शिवराय हे उभ्या महाराष्ट्राचे दैवत मानले जात असताना आंध्रप्रदेश प्रशासनालाच त्यांचे वावडे का बरे असावे, हा खरा सवाल आहे. आकस आणि तेढ निर्माण करुन आंध्रातील त्या प्रशासनाला नेमकं काय साध्य करायचे आहे, असा सवाल कोणाच्याही मनात येणं स्वाभाविक आहे. तथापि या विषयावरुन वातावरण दूषित होऊ नये यासाठी महाराष्ट्राचे व आंध्राचे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बोलणी करावी व यात जे लिप्त आहेत, त्याची प्रथम सखोल चौकशी व नंतर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश द्यावेत अन्यथा असे कितीतरी संतोष बांगर तयार होऊन आंध्राची एकही गाडी महाराष्ट्राच्या भूमीवर दिसणे मुष्किल होईल, असं चित्र कुठेही दिसायला नको. खरंतर तोड फोड आणि जाळपोळ ही भाषाच मूळी कोणाच्याही तोंडी येता कामा नये. अन्यथा हिंदूह्रदयसम्राट, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पुकारलेला व सर्वत्र गाजलेला ‘तो लढा आजही स्मरणात आल्याशिवाय राहणार नाही, याचेही आंध्राच्या प्रशासनाने भान ठेवल्यास पुढील अनर्थ टळू शकेल एवढं निश्चित.