
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच मराठवाडा दौऱ्यावर येत असून, रविवारी सकाळी १० वाजता ते विभागीय आयुक्त कार्यालयात अतिवृष्टी, पीक-पाणी व विकासकामांचा आढावा घेणार आहेत. शनिवारी त्यांचे शहरात आगमन होणार आहे. रात्री शासकीय विश्रामगृहावर ते मुक्कामी असतील.
शनिवार व रविवार असे दोन दिवस ते जिल्हा दौऱ्यावर आहेत. आमदार रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार व प्रदीप जैस्वाल यांच्या मतदारसंघात कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
रात्री आठ वाजता त्यांचे शहरात आगमन होईल. रविवारी सकाळी १० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा मुख्यमंत्री घेतील. ११.३० वाजता पत्रकार परिषद होईल. दुपारी १.३० वाजता सिल्लोड येथे बाळासाहेब ठाकरे उद्यानाचे लोकार्पण त्यानंतर २.३० वाजता नगर पालिका इमारतीचे भूमिपूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, प्रवेशद्वाराचे लोकार्पण, सूतगिरणीचे भूमिपूजन होईल. २.४५ वाजता नगर परिषद मैदानावर शिवसेना पक्षाची सभा होईल. दरम्यान, दुपारी २.३० वाजता ते आ.सत्तार यांच्या निवासस्थानी भेट देतील. दरम्यान आमदार प्रदीप जैस्वाल यांचे कार्यालय, गुरुद्वाराला मुख्यमंत्री शिंदे भेट देतील. शासकीय दौऱ्यावर संभाजीनगरचा उल्लेख, शहराचे संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्याला स्थगिती देत मुख्यमंत्री शिंदे यांनी नव्याने ठराव घेऊन छत्रपती संभाजीनगर असे शहराचे नामकरण केले. या निर्णयाला विरोधात न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आमदार संजय शिरसाट यांच्या मतदरासंघात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काय कार्यक्रम आहेत, याचा उल्लेख टाळण्यात आला आहे. पण आ.शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयाला शिंदे भेट देणार असल्याचा दावा केला जात आहे.