
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : ज्या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणासाठी समाजसेवक विशाल बुधवंत यांनी आंदोलन छेडले होते होते, त्याला यश येऊन सदर रस्त्याचे दुरुस्तीचे कामही हाती घेण्यात आले आहे.
जुना कारेगाव रोड ते उघडा महादेव मंदीर दरम्यानचा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. वाहने तर सोडाच परंतु नागरिकांनाही रहदारी करणे दूरापास्त झाले होते. वयोवृध्द नागरिक आणि आजारी रुग्णांची गैरसोय होत होती. परिणामी नागरिकांचा संताप अनावर झाला होता. त्याचाच परिपाक म्हणून समाजसेवक विशाल बुधवंत यांनी याच रस्त्यावरील चिखलात बसून ठिय्या आंदोलन केले छेडले होते. नागरिकांनी सुध्दा मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवली होती. दैनिक चालू वार्ता ने सुध्दा नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवणे शक्य व्हावे यासाठी ठळक मथळ्यातील वृत्ताद्वारे प्रसिध्दी देण्याचे सहकार्य केले होते. त्याचीच परिणीती म्हणून महापालिकेने अधिकारी पाठवून घटनैची पहाणी करत दोन दिवसात काम सुरु केले जाईल असे आश्वासन दिले होते.
त्यांचं आश्वासनांची परिपूर्ती म्हणून या रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाची सुरुवात करुन जनतेला पूरता दिलासा दिला. परिणामी विशाल बुधवंत यांच्या आंदोलनाला भरीव यश मिळाले आहे. जनतेत ही आनंद व्यक्त केला जात आहे.
या प्रसंगी विशाल बुधवंत यांनी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परवानगी दिली तर केवळ आपल्याच नाही तर संपूर्ण परभणी शहरातील जे जे रस्ते खस्ता हाल झाले आहेत त्या सर्व रस्त्यांच्या डागडूजी साठी व दुरुस्तीसाठी माझी स्वत:ची वाहने अगदी मोफत वापरुन ती सेवा केली जाईल असे जाहीर आश्वासन दिले. तथापि त्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आम्हाला रॉयल्टी माफ करुन मुरुम उपलब्ध करुन दिल्यास ते काम मी करीन असेही सांगितले. काम अधिक शीघ्र गतीने हवं असेल तर एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या गाड्या उपलब्ध करण्याचे निर्देश दिले तर तेही उपयुक्त ठरु शकेल असे सांगितले.
शहराचा, पर्यायाने प्रत्येक रस्त्यांचा प्राथमिक स्वरुपात का होईना परंतु खरोखरच विकास व्हावा असे वाटत असेल तर जिल्ह्याचे पालकत्व असलेल्या आंचल गोयल यांनी काय निर्णय घ्यावा, हे त्यांच्याच हातात आहे. आवश्यकता असल्यास महापालिकेला ही तसे निर्देश देऊन पाऊस काळात अत्यंत उपयुक्त अशा या कामांना चालना देऊन प्रत्येक रस्त्यांचा पर्यायाने शहराचा विकास घडवून आणला तर नक्कीच समस्त परभणी वासियांचा आशीर्वाद मिळू शकेल यात शंकाच नसावी.