
दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधी-
परभणी : जगात जर्मनी व भारतात परभणी म्हणून ओळख असलेल्या परभणी शहरात मंदीरे आणि त्यातील देव सुद्धा आता सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी भाविक -भक्तांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.
वसमत रोडवरील दादाबाडी जैन मंदीरात शुक्रवारी रात्री चोरीचा हा प्रकार घडल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले आहे. पुजारी व अन्य भक्ताने जेव्हा हे मंदीर खोलले त्यावेळी तेथील अस्ताव्यस्त सामानावरुन आढळून आले.
गाभाऱ्यातील देवाच्या शिरावरील चांदीचे छत्र आणि देवालयात असलेल्या दोन दान पेट्याही फोडून त्यातील सुमारे दीड लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचे उजागर झाले आहे. देवालयातील गाभाऱ्याचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला असावा अशी शक्यता मुकुट चोरीच्या प्रकरणावरुन वाटणे स्वाभाविक आहे. शिवाय देवालयातील दोन्ही दान पेट्या फोडून एक देवालयातील जागेवरच आहे तर दुसरी मंदीराच्या पाठीमागे टाकल्याचे आढळून आले आहे.
सदर घटनेची खबर पोलिसांना कळवतात पोलीस उपाधीक्षक श्री. सुदर्शन, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, पोलिसांचे पथक व श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपासाची चक्रे वेगाने फिरली जात आहेत. तपासाअंतीच यातील सत्यता उजागर होईल हा भाग वेगळा परंतु परभणीत आता देवही सुरक्षित नाहीत एवढे मात्र खरे. परभणी शहर व लगतच्या परिसरात मागील कित्येक कालावधीपासून दिवसेंदिवस क्राईम रेषो वाढत चालला असून दिवसागणिक दुकाने, घरे तर फोडली जात आहेतच शिवाय खून, खूनाचा प्रयत्न, हल्ले, जबरी चोरी आणि मारामारी हे प्रकार तर आता नित्याचेच झाल्याचे दिसून येत आहे. भूरट्या का सराईत चोरांनी आता देवालयातील बंदीस्त देवांनाच लक्ष्य केले असावे हेच या घटनेमुळे पुढे येत आहे. बॅंकांमध्ये जेव्हा जेव्हा दरोडे पडले तेव्हा कोणी तरी बॅंकेशीच निगडित असल्याचे तपासात आढळून आल्याच्या बहुतांश घटना निदर्शनास आल्याचे ऐकिवात असल्याने या प्रकरणातही कोणी तरी जवळच्याच माहितगार तर नसावा ना, अशी शंकाही पुढे आल्यास आश्चर्य वाटू नये.