
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : सरकारची ‘आरे’रावी सुरूच आहे. मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जंगलातील झाडांची रात्रीच्या अंधारात कत्तल केली जात आहे.
जेसीबी लावून पोलीस बंदोबस्तात झाडे उखडून टाकली जात आहेत. पर्यावरणप्रेमींनी गुरुवारी रात्री या कत्तलीविरोधात आरेमध्ये तीव्र आंदोलन केले. घोषणाबाजी करून रस्ताही अडवून धरला. पोलिसांनी 18 आंदोलकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
आरेत मेट्रो कारशेडला पर्यावरणवाद्यांचा जोरदार विरोध होत असला तरी सरकारची जंगलतोड सुरू आहे. गुरुवारी रात्री तशी कुणकुण पर्यावरप्रेमींना लागताच त्यांनी कारशेडच्या परिसरात धाव घेतली. पर्यावरणप्रेमी आंदोलनाला उतरल्याचे समजताच आरे पोलीसही तिथे पोहोचले. तीन पर्यावरणप्रेमींवर पोलिसांनी ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्री 8.30 च्या सुमारास काही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी कारशेडच्या परिसरात घोषणाबाजी करत तिथेच ठाण मांडले. रस्ता अडवून धरला. पोलिसांनी आंदोलकांमधील 18 जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले.