
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
यवतमाळ: ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मी पूरग्रस्त भागात कधी जावं हे सांगणे म्हणजे बालिशपणा आहे, तुम्ही मंत्री नेमा, पालकमंत्री नेमून पूरग्रस्तांना दिलासा द्या, आमच्या कामात नाक खुपसू नका’ असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.
राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे. शुक्रवारी त्यांनी यवतमाळ जिल्ह्याची पाहणी केली. यावेळी पत्रकार परिषदेत घेऊन अजितदादांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘आम्ही दोघे खंबीर आहोत असे सांगून जनतेला वाऱ्यावर सोडण्यापेक्षा केंद्र सरकार, एनजीओ, सीएसआर फंडच्या माध्यमातून पूरग्रस्तांना तात्काळ भरीव मदत द्या.
केंद्राच्या विचाराचं सरकार राज्यात पाहिजे होतं ना, तर आता आलंय ना? मग पूरग्रस्तांना केंद्राकडूनही मदत आणा, असा खोचक टोला अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पूर आल्यावर गडचिरोलीचा दौरा करणे हे राज्याचा प्रमुखाचं कामच आहे, त्यांच्याकडे विमान आणि सगळी यंत्रणा उपलब्ध असते. तरी देखील त्यांनी पुलावरून पुराची पाहणी केली, जिल्हा मुख्यालयात बैठक घेतली, असा हल्लाबोल देखील अजित पवार यांनी केला.
‘मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील आज मी कधी पूरग्रस्त भागात जावं यावर बोलले. हे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. तुम्ही खंबीर असले तरी 36 जिल्ह्यात पालकमंत्री नेमले तर ते तिथे जाऊन आढावा घेऊ शकतात. या सर्व चर्चा बालिश आहे, अशी टीकाही अजितदादांनी केली.
सगळी खाती आज मुखमंत्र्यांकडे आहे, उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं त्यांच्या कडे कोणती खाती आहेत. उद्धव ठाकरेंच्या वेळी ही परिस्थिती नव्हती. हे सगळं दुर्दैवी आहे, त्यांनी त्यांचा अधिकार वापरावा. माझी विनंती आहे ज्या पक्षाला जे करायचं ते करा, ही वेळ मदत करण्याची आहे, असंही अजितदादांनी बजावलं. ‘दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाल्या शिवाय मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, त्यामुळे हे सगळे केविलवाणे प्रयत्न सुरू आहे. अधिवेशन तातडीने होणार नाही असं वाटतंय कारण अजून मंत्रिमंडळ विस्तार नाही, खाते वाटप नाही, असंही अजित पवार म्हणाले.