
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे: एका शिक्षण संस्थेत झालेला शिक्षक भरतीचा घोटाळा आता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आला आहे. हा घोटाळा उघडकीला आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना ईडीने चौकशी करून अधिक माहिती घेण्यासाठी बोलावले असून, या शिक्षक भरती घोटाळ्यातील आर्थिक व्यवहारांबाबत ईडीला संशय आहे.
आकुर्डी येथील एका शिक्षण संस्थेत काही वर्षांपूर्वी बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक भरती करण्यात आली होती. संगनमत करून ही भरती झाल्याचे चौकशीत उघडकीस आले होते. त्यात २३ शिक्षकांची भरती बोगस झाल्याचे आढळले होते. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात १९ ऑक्टोबर २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला होता.
पुणे जिल्हा परिषद, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. या शिक्षण संस्थेने उरुळी कांचन येथील त्यांच्या संस्थेत काही शिक्षकांची बोगस भरती केल्याचे दाखविले. त्या आधारावर राज्य सरकारकडून पगार काढून घेतले. या प्रकरणात कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे.