
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-शाम पुणेकर
१ ऑगस्ट ला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना नम्र अभिवादन करून त्यांची जयंती साजरी केली जाते.
परंतु उत्साहाच्या भरात आपल्या हातून शुध्दलेखनाच्या काही चूका होवून जातात.
आपले लोकप्रिय दैवत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे मूळ संपूर्ण नाव “तुकाराम भाऊराव साठे” असे आहे. तुकाराम उर्फ अण्णा हे त्यांचे नाव असून भाऊराव हे त्यांच्या वडिलांचे नाव आहे.
म्हणूनच त्यांचे नाव अण्णा (स्वता:) भाऊ (वडील) आणि साठे (आडनाव) म्हणजेच त्यांचे प्रचलित नाव *अण्णा भाऊ साठे* असे स्वतंत्ररित्या संबोधावे किंवा लिहिले जावे.
अण्णाभाऊ साठे असे एकत्रित लिहू नये.
उदा : दत्तो वामन पोतदार
प्रल्हाद केशव अत्रे
बाळ गंगाधर टिळक
यशवंत बळवंतराव चव्हाण
शरद गोविंद पवार
देवेंद्र गंगाधर फडणवीस इ ..
साधारणपणे २०% लोकच “अण्णा भाऊ साठे” असे योग्य व बरोबर नाव लिहीतात, बाकीच्यांनीही हे अनुकरण करून त्यांचे योग्य नाव लिहावे ही नम्र अपेक्षा.
अल्प परिचय :
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे उपेक्षित समजल्या जाणाऱ्या मातंग समाजात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालबाई असे होते. त्यांच्या बहिणीचे नाव जाईबाई असून भावाचे नाव शंकर भाऊ साठे असे आहे. अण्णांनी दोन विवाह केले होते.
त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई तर दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंता असे होते. त्यांना एकूण तीन अपत्ये असून त्यांची नावे मधुकर, शांता आणि शकुंतला अशी आहेत. अण्णा यांचे मूळ नाव तसे तुकाराम परंतु संपूर्ण जग त्यांना अण्णा भाऊ साठे या टोपणनावानेच ओळखत. अण्णांचे शिक्षण तसे झालेले नव्हते, परंतु तरीही कठोर प्रयत्नांतून त्यांनी अक्षरज्ञान प्राप्त केले.
मोजकेच शिक्षण घेतलेले अण्णा भाऊ साठे लहानपणीच आपल्या वडिलांसोबत मुंबई येथे आले. मुंबईला अंगावर पडेल ते काम त्यांनी केले. गिरणीमध्ये झाडूवाल्याची नोकरी पासून ते कोळसे वेचण्यापर्यंत सर्व कामे त्यांनी केली.
“गरिबीने ताटतुट केली आम्हा दोघांची,झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबांध झाली भाकर तुकड्याची”
या त्यांच्या कवितेतून त्या वेळच्या मुंबईचे दर्शन होते.
अण्णा भाऊ साठे जसे समाजप्रिय शाहिर होते तसे ते लोकप्रिय साहित्यिकही होते. त्यांनी जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी साहित्यातील लोकनाट्य, पोवाडे, लावणी, प्रवास वर्णन, कथा, कविता, स्फूरणदायी गीते इ. क्षेत्रांत त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले आहे. अण्णांच्या साहित्यात समाजातील वैर व जातीभेद नष्ट करण्याचे सामर्थ्य आपल्याला दिसून येते. त्यांनी तत्कालीन सामाजिक पस्थितीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे काम केले. तमाशाला सांस्कृतिक वारसा मिळवून देण्याचे श्रेय अण्णा भाऊ साठे यांचे कडे जाते.
तमाशात काम करताना स्त्रियांचे होणारे शोषण या विषयावरील त्यांची ‘वैजयंता ‘ ही कादंबरी, तर भीषण दुष्काळात ब्रिटीशांचे खजिने व धान्य गोदाम लुटून गोरगरिबांना व श्रमिकांना वाटणाऱ्या तरुणाची कथा सांगणारी ‘फकिरा’ अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना जाणून घेऊन त्यांवर केलेले लेखन हे अण्णांची विशेषता होती. शिवाय ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी त्यांना कळेल अशा भाषेत पोवाडे, लावण्या व गीते त्यांनी लिहिली आहेत.
असे स्वतः अल्पपशिक्षीत असूनही उच्च शिक्षीतांना व उच्चभ्रू लोकांनाही हेवा वाटावा असे आपले अण्णा भाऊ साठे हे सर्व गुणसंपन्न, समाजभूषण व ख-या अर्थाने समाजरत्न होते. त्यांना सरकारने “भारतरत्न” हा सर्वोच्च किताब बहाल करावा अशी मागणी करून त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो!
संकलक: शाम पुणेकर पत्रकार.