
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी-दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यांतर्गत गौर गावात असलेली दुर्दशाग्रस्त जि.प.शाळा विद्यार्थी व पालकांना जीवघेणी व चिंताजनक अशीच ठरली आहे. निजाम काळात बांधलेली ही शालेय इमारत जुनाट अवस्थेत तर आहेच शिवाय या इमारतीची कोणतीही सुधारणा नाही, तेथे साफसफाई केली जात नाही. शाळेच्या या इमारतीत व सभोवताली सर्वत्र उंच उंच गवत व अन्य भितीयुक्त झाडांमध्ये लिप्त झाली आहे. सदर घाणीच्या साम्राज्यात जखडलेल्या या इमारतीत व सभोवताली अधूनमधून सापांचा सुध्दा वावर असल्याचे बोलले जात आहे. परिणामी मुठीत जीव घेऊन वावरणारे विद्यार्थी व पालक पूरते चिंताग्रस्त झाले आहेत. जुनाट व निजामकालीन ही शाळेची इमारत त्वरीत बांधून न्याय द्या अन्यथा तोडगा म्हणून काढलेल्या लगतच्या शाळेला चक्क टाळणेच मारु असा निर्वाणीचा इशारा गौर गावच्या संतप्त नागरिकांनी शासनाला दिला आहे.
पूर्णा शहरापासून पाच कि.मी. अंतरावर गौर नावाचे गाव आहे. सुमारे चार ते पाच हजार मतदार संख्या असलेले हे गाव सर्कल सुध्दा आहे. धार्मिक व सांस्कृतिक वारसा असलेल्या या गावाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. जेवढी राजकारणाशी जवळीक तेवढीच शेतीत काबाड कष्ट करण्याची वृत्ती असलेल्या येथील नागरिकांनी मनात आणलं तर लोकसहभागातून भव्य अशी शाळेची इमारतही उभी करु शकतील परंतु शासनाची चाकोरी आणि मिळणारे हक्क या गोष्टींचा गांभीर्याने विचार केल्यास सदर इमारत परिस्थितीचे अवलोकन करु मागणी न करताच बांधून देणे क्रमप्राप्त ठरते परंतु तसे केल्यास ते प्रशासन कसले ? असंही नाईलाजाने म्हणावे लागते.
सदरची इमारत नव्याने बांधून दिल्यास तेथे प्रशस्त अशी टोलेजंग वास्तू उभारली जाऊ शकते. त्यासाठी ग्रामस्थांनी पूर्णा पंचायत समिती व परभणी जिल्हा परिषदेचे अनेकदा दरवाजे ठोठावले आहेत. परंतु भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आणि झोपेचं सोंग घेतलेल्या शिवाय गेंड्याची कातडी पांघरलेल्या या अकार्यक्षम प्रशासनाला जाग ती कशी येणार, हे सुध्दा तितकंच खरं आहे. सदर इमारतीची नव्याने उभारणी करुन विद्यार्थी संख्येत वाढ आणि त्यांना व पालकांना दिलासा देण्याऐवजी तातपुरता तोडगा म्हणून लगतच एक शाळा शाळा सुरु करण्याचे मतलबी औदार्य ह्या प्रशासनाने दाखविल्याचे दिसून येत आहे. शाळा सकाळी आठ ते नऊ वाजता सुरु करण्याऐवजी शहरी भागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेला म्हणजे दहा वाजता सुरु केली जाते. भल्या पहाटे उठून अगोदर घरातली व नंतर शेतातली कामे उरकण्यासाठी सकाळी आठ वाजता घरांना कुलूप (टाळे) लावून घरे सोडणारा कष्टकरी, कामगार, शेतकरी वर्ग न चुकता शेतावर जात असतो. दहा वाजता भरणारी शाळा आणि आठ वाजता घराबाहेर पडलेले विद्यार्थी तब्बल दोन तास कुठे बसणार, कुठे फिरणार, शाळेला जाणार का नाही, गेलेच तर सापांची भीती, परिणामी काय संकट ओढवते की, या व अशा नानाविध समस्यांयुक्त प्रश्नांनी भंडावून सोडलेले पालकांचा जीव शेतात राबतांनाही टांगणीलाच बांधल्याचे सतत दिसून येत असते.
कुंडलीत मनोहरराव जोगदंड नामक शेतकऱ्यांने तर आपल्या सहकारी ग्रामस्थांच्या समवेत व्यक्त केलेला राग अगदी पोटतिडिक उठवणाराच असल्याचे आढळून आले. हातातली महत्वाची कामे टाकायची, गाव सोडून शहर गाठायचे नि पं. स. व जि. प. मधील प्रशासनाला अर्ज विनंत्या करायच्या, प्रसंगी हाता-पाया पडायचे, विनवण्या करायच्या, तरीही प्रशासनातील ते ढिम्म अधिकारी बोलणं किंवा ऐकून घेणं तर सोडा परंतु आमच्याकडेही बघायलाही तयार नसतात हे अगदी खेदाने सांगावे लागते असं ते म्हणाले. अधिकाऱ्यांना जणू त्यांच्याच घरातूनच द्यावे लागते अशा गुर्मीत वागतात याची चीड व्यक्त करीत त्यांनी नव्याने राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच थेट आवाहन केले नि आमच्या गावची नव्याने शालेय इमारत बांधून लहान लहान अशा असंख्य मुलांना जीवदान अशी हात जोडून केलेली विनंती पोटाला पिळवण्या देणारी व डोळ्यांत असून आणणारी आर्त हाक असल्याचेच वाटत होते. जीव टांगणीला लावणारी दोन उदाहरणे म्हणजे एक तर शासनातर्फे पुरवठा केले जाणा-या आहारामधील मैद्याच्या चपात्या लहान मुलांना आणि गाईंनाही संकट काळ ठरल्या जात असल्याचा भयानक प्रकार त्यांनी सांगितले. जोगदंड यांनी आपला राग व्यक्त करीत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यावरही बरेच तोंडसुख घेत मध्यान्ह वेळी दिला जाणारा असा जीवघेणा आहार आमच्या (ग्रामीण) मुलांना न देता हवं तर शहरी भागात द्या असे ठणकावले. त्यांनी पुढे असेही ठणकावले की, लवकरात लवकर आमच्या गावची शालेय इमारत बांधून द्या अन्यथा लगतच्या शाळेला ही आम्ही टाळे ठोकू.
जिल्हाधिकारी गोयल यांच्याकडे दाद मागावी
—————————————-
परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल ह्या कार्यतत्पर आहेत. कर्मठ आहेत. लोकांच्या समस्येची त्यांना पूर्ती जाणीव आहे. समस्या खरी आणि गंभीर असेल तर त्या नक्कीच या प्रकरणी लक्ष घालतील व न्याय देण्याचा प्रयत्नही करतील असा त्यांचा बाणा आहे. योग्य ते पुरावे आणि वास्तविकता नेमकी काय आहे, याविषयीची छायाचित्रे काढून त्यांच्याकडे दाद मागावी. त्या निश्चित वास्तव समजून घेतील व योग्य असा मार्ग काढू शकतील असा विश्वास आहे. सरळ मार्गाने व अर्ज विनंत्या करुनही न्याय मिळत नसेल तर छिनून घ्यायचा हक्क आहे नव्हे तो अधिकार संविधानाने दिला आहे. प्रसंगी न्याय्य मागण्या मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल परंतु कायदा हातात न घेता कायद्याच्या चाकोरीत राहूनच अहिंसावादी गांधीजींच्या मार्गाचे अवलोकन केले तर नकक्कीच जय आपलाच, असा विश्वास या प्रसंगी देणे उचित राहील.