
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे :घरातील कपाटाच्या कुलुपाची दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने १५ तोळे सोन्याचे दागिने तसेच दोन लाखांची रोकड एकाने लांबविली. पसार झालेल्या चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी नंदुरबारमधून अटक केली. या प्रकरणी चोरट्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांकडून १५ तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाख ९० हजारांची रोकड जप्त करण्यात आली.
प्रधानसिंग उर्फ पठाण बख्तारसिंग शिकलीकर वय ४१, रा. एकतानगर, नंदूरबार असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. शिकलीकरच्या विरोधात गुजरातमधील राजकोट, सुरत शहरात घरफोडीचे सात गुन्हे दाखल आहेत. मंगळवारी २६ जुलै शिकलीकर आणि अल्पवयीन साथीदार ताडीवाला रस्ता आले होते. घरातील कपाटांचे कुलुप दुरुस्तीचे बतावणी ते करीत होते. एका महिलेने त्यांना कुलुप दुरुस्तीसाठी घरात बाेलाविले. तेव्हा शिकलकरने महिलेला नट आणण्यासाठी बाहेर पाठविले. ती संधी साधून शिकलीकरने कपाट उचकटले. कपाटातील १५ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लाखांची रोकड लांबवून तो साथीदारासह पसार झाले.
त्यानंतर महिलेकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर बंडगार्डन स्टेशनच्या पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस हवालदार नितीन जगताप यांना गुजरातमधील खबऱ्याने चोरट्यांबाबतची माहिती दिली. शिकलीकर आणि साथीदाराने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. शिकलीकर नंदूरबारला पसार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाने त्याला नंदुरबारमधून ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त आर. एन. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, उपनिरीक्षक राहुल पवार, नितीन जगताप, अनिल कुसाळकर, अमोल सरडे, संजय वणवे, सागर घोरपडे आदींनी ही कारवाई केली.