
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : केशवनगर – मुंढवा येथील लोणकर वस्ती येथे अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डे म्हणण्यापेक्षा रस्त्यांचे तळे झाले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. खड्ड्यांमुळे अंतर्गत रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. या रस्त्यांवरून प्रवाशांचा जीव धोक्यात आला असून, महापालिका प्रशासन मात्र सुस्तावलेल्या अवस्थेत आहे.
या रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले, परंतु प्रवाशांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. रस्त्याची अवस्था थोड्याच दिवसांत पुन्हा जैसे थे होऊन प्रवाशांच्या वाट्याला ही चिखलमय बिकट वाट आली आहे. महापालिका प्रशासनाने रस्त्याचे खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करावा, अशी मागणी केली जात आहे.
महापालिकेकडे सदर रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या फोटोसह ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली. मात्र कहर म्हणजे प्रत्यक्षात येथे काम न करताच ही ऑनलाइन तक्रार क्लोज करण्यात आली. महापालिका प्रशासनाच्या या अजब कारभाराचा नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे.