
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरातील खंडोबा बाजार परिसरात शनिवारी रात्री पुन्हा एक खूनाची घटना घडली आहे. नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पाठोपाठ एक अशी खूनाची शृंखलाच सुरु असल्यामुळे शहरात सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान नानलपेठ पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत अवघ्या २४ तासात एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात मिळविलेले यश उल्लेखनीय असेच म्हणावे लागेल.
पैशाच्या व्यवहारातून घडलेली खूनाची ही घटना परिसरात भयभीत करणारी ठरली जात असली तरी ती पोलिसांनाही आव्हानच ठरली होती, हे वेगळे सांगायला नको. मयत तरुण रफिक शेख चांद शेख उर्फ बाबा याचे व आरोपी यांच्यात आर्थिक व्यवहारातून काही तरी बिनसले होते. गुन्हा दाखल आरोपीला पकडण्यासाठी नानलपेठ पोलिसांनी शिताफीने यश मिळविले.
खंडोबा बाजार परिसरात, देशमुख हॉटेल नजिक झालेली हत्या नागरिक व पोलिसांनाही चक्रावून टाकणारी ठरली होती. नुकताच वसमत रोडवरील जैन मंदीरात घडलेल्या चोरीच्या घटनेत एक किलो चांदीची छत्री आणि दोन दान पेट्या ज्यामध्ये लाखो रुपयांची रोकड लुटून पोबारा केल्याची नोंद पोलिसांनी केली आहे तर त्याच परिसरात चोरट्यांनी आणखी चार दुकाने फोडून बरीचशी रोकड व मालही लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुध्दा नवा मोंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकाच रात्रीत सलग चार दुकाने फोडल्यामुळे रविराज कॉम्प्लेक्स मधील व्यावसायिकांमध्ये कमालीची चिंता व्यक्त केली जाणे स्वाभाविक आहे. दिवसा खूनासारख्या गंभीर घटना तर रात्री दुकान फोडीच्या वाढत्या प्रकाराने परभणी शहर व परिसरात क्राईमचा रेषो दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे. परिणामी पोलीसांचीही चिंता वाढली आहे.
वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण, तुलनेने अपूरे पोलीस बळ पर्यायाने गुन्हेगारीने अधिकच डोके वर काढले असल्याने गुन्हेगारीचा हा वाढलेला रेषो कमी करणे आवश्यक असून नागरिकांनाही दिलासा देणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस आणि नागरिक यांच्या समन्वयातून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कार्य क्षेत्रात गस्ती पथके निर्माण करणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे. सुशिक्षित बेकार तरुण व अनुभवी नागरिकांचा समावेश करुन निर्माण गस्ती पधकांना तशी ओळखपत्रे देणे आवश्यक आहे. सदर पथकांच्या दिमतीला काही पोलीस कर्मचारी व विभागवार एकेक अधिकारी दिल्यास प्रबळ शक्ती तर निर्माण होईलच शिवाय पळता भूई थोडी होणा-या गुन्हेगारांच्या मुसक्या शिताफीने आवळणेही शक्य होऊ शकेल. त्यामुळे बिघडणारी कायदा व सुव्यवस्था पण चाकोरीत राहू शकेल यात तिळमात्र शंका नसावी.