दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
शिऊर : आपले चित्त भगवंताच्या पायी लावणे म्हणजे परमार्थ असून सर्व संपत्तीपेक्षा परमार्थ मधील संपत्ती महत्वाची आहे, संत शंकरस्वामी महाराजांनी अध्यात्मिक संपत्ती बहाल करून आपल्याला श्रीमंत केले असे प्रतिपादन संत शिवाई संस्थानचे अध्यक्ष , भागवताचार्य पंढरीनाथ महाराज पगार यांनी केले.
शिऊर येथे सुरू असलेल्या श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या २७७ व्या फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दिनांक ४ रोजी त्यांचे कीर्तन झाले, “माझे चित्त तुझे पायी” या रचनेवर विवेचन करताना ते बोलत होते.
मानवी विकासाचे केंद्रस्थान म्हणजे हरिनाम सप्ताह असून, या सप्ताहाच्या माध्यमातून अध्यात्मिक विचारांची ऊर्जा मिळत असते, साधुसंतानी भारतीय संस्कृती टिकवली असल्याचे पंढरीनाथ महाराज पगार यांनी नमूद केले.
*आमदार बोरणारे यांची भेट, ७७ पोते साखरेची रक्कम सुपूर्द*
कोरोनाच्या प्रादुर्भावनंतर व्यापक प्रमाणात हा सप्ताह होत आहे, सप्ताह मध्ये भाविकांची लक्षणीय उपस्थिती दिसून येत आहे, वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरणारे यांनी आज या सप्ताह मध्ये भेट दिली व महाप्रसादसाठी ७७ पोते साखरेची रक्कम सप्ताह समितीकडे सुपूर्द केली.
दरम्यान शिऊर या संतभूमीच्या विकास करण्यासाठी कटिबद्ध असून शिऊर गावात स्वागत कमान, अंतर्गत रस्ते, पेव्हर ब्लॉक , सभामंडप, प्रणिता तीर्थ विकासासाठी तब्बल सव्वा तीन कोटींचे अंदाजपत्रक तयार केले असल्याचे आमदार बोरणारे म्हणाले. यावेळी वैजापूरचे उपनगराध्यक्ष साबेर खान, जिल्हा परिषद सदस्य रामहरी जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
