
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-
धार्मिक मुलतत्ववाद्यांनी खासकरुन इस्लामी मुलतत्ववाद्यांनी जगभर घातलेला धुमाकूळ, हिंसा, जिहाद या सर्वाचे कुणीही समर्थन करणार नाही, त्याचे समर्थन करताही येणार नाही. या आतंकवादाची मूळं जगाच्या आर्थिक राजकारणात कशी दडलेली आहेत, याबद्दलही बराच ऊहापोह झालेला आहे. एकेकाळी अमेरिका आणि सोवियत युनियन यांच्यात चालू असलेले शीतयुद्ध, या शीतयुद्धात सोवियतचे अफगाणिस्तानातील आक्रमण थोपवण्यासाठी अफगाणिस्तानातल्या तरुणांना लष्करी शिक्षण देवून अमेरिकेने पोसलेला दहशतवाद, इंधन तेलासाठी अमेरिकेने केलेली आखाती देशातील घुसखोरी, अमेरिकेने रसद पुरवणे बंद करताच त्यांनीच ‘ट्रेन’ केलेल्या ओसामा-बिन-लादेन याने अमेरिकेवरच केलेला जगप्रसिद्ध हल्ला याबाबतही भरपूर उहापोह झालेला आहे.
पण मूळात आतंकवाद हा शब्द फक्त धार्मिक मुलतत्ववाद्यांकडून होत असलेल्या हिंसाचारापुरताच मर्यादित ठेवायचा का? मूळात ‘हिंसा’हा शब्द फक्त एका माणसाने दुसऱ्या माणसाची केलेली कत्तल एवढ्या पुरता मर्यादित आहे का?
आतंकवाद, दहशतवाद हा कधीही समर्थनीय नाही. पण केवळ ‘धार्मिक आतंकवादाबद्दल’ बोंबाबोंब करुन इतर अनेक बाबतीतल्या आतंकवादावर/दहशतवादावर पांघरून टाकण्याचे राजकारण सोईस्करपणे होत असते अन आपल्यातले अनेकजण त्याला सहजपणे बळी पडत असतात.
मानवी जीवनातील स्वातंत्र्य हिरावून घेवून मोकळेपणाने जगण्यास अडसर आणणारी, मानवी न्याय्य-हक्कांची पायमल्ली करुन भीतीचे, असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणारी प्रत्येक कृती अगर विचार हा ‘आतंकवाद किंवा दहशतवाद’ या प्रकारात मोडतो. म्हणूनच आतंकवादाचे इस्लामी आतंकवादाच्या पलिकडेही अनेक चेहरे आहेत. आतंकवादाच्या किंवा दहशतवादाच्या मगाशी सांगितलेल्या व्याख्येला अनुसरुन भारतातील वर्ण-जातीच्या नावाखाली ज्या काही अमानवी विचार व कृती झाल्या त्या सर्व ‘दहशतवाद’ या प्रकारात मोडतात. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणे, त्याला समाज, देव, धर्म, धार्मिक स्थळे, धार्मिक विधी, शिक्षण, ज्ञान या सर्वापासून तोडणे अन गुलामीच्या काळोखात कोंडून टाकणे हा सुद्धा दहशतवादच आहे. हा दहशतवाद इतका भयानक आहे की अनेक महामानवांनी केलेल्या अनेक काळापासूनच्या प्रयत्नांनाही तो शिरजोर ठरतो आहे. आजही वर्ण-जात विषमतेच्या दहशतवादाने पिडीत झालेला बहुसंख्य समाज अज्ञान, न्यूनगंड, दारिद्र्य या संकटातून मान वर काढू शकलेला नाही. केवळ आरक्षण अगर सवलती देवून वर्ण-जातीच्या दहशतीचा शेकडो वर्षापासूनचा बळी असलेला समाज मुख्य प्रवाहात कसा येईल? आजही या समाजाला पुण्यासारख्या विद्येचे व संस्कृतीचे माहेरघर असलेल्या शहरात जात लपवून नोकरी करावी लागते. मोलकरणीची खरी जात कळताच तिला नोकरीवरुन काढले जाते. राजकीय आरक्षणाने खालच्या जातीतील काही लोक सत्तेत आले खरे पण त्यांचे कर्ते-करविते, धनी हे सवर्णच राहिले. रस्ते साफ करणे, गटारी साफ करणे, शौचालये धुणे, गोण्या उचलणे, अंगमेहनीची कामे करणे एवढेच काय पोटाची खळगी भरण्यासाठी देहविक्रय करणे अशा सर्व ठिकाणी वर्ण-जातीच्या दहशतीने पिडीत झालेला समाजच आढळेल. इस्लामी दहशतवाद तर खतरनाक आहेच, पण आपल्याच देशात, आपल्याच समाजाच्या पोटात पोसलेल्या वर्ण-जाती व्यवस्थेच्या दहशतवादाचे काय?
वर्ण-जातीच्या दहशतवादापलिकडे आर्थिक दहशतवाचे भले मोठे संकट आपल्यासमोर उभे आहे. पण हा आर्थिक दहशतवाद आपण सगळ्यांनी जणू पचवून टाकला आहे किंवा त्याचा त्रास होत असतानाही तो आपण पचवावा अशी व्यवस्था या क्षेत्रातल्या दहशतवाद्यांकडून केली गेली आहे.
भारताच्या संविधानात आपण ‘समाजवादाचे’ तत्व स्विकारले आहे. समाजवादाचा अर्थ होतो देशातल्या नैसर्गिक संसाधनांवर व उत्पादनाच्या साधनांवर समाजाची (मूठभरांची नव्हे) मालकी असणे. आपल्या देशात दिवसेंदिवस सार्वजनिक मालमत्तांचे खाजगीकरण होत आहे. पूर्वी हे खाजगीकरण सार्वजनिक मालकीच्या कंपन्या तोट्यात असल्याचे भासवून केले जायचे आता तर सरळ सरळ देशाच्या ‘बजेट’मधील वित्तीय तूट भरुन काढण्यासाठी नफ्यातल्या सार्वजनिक कंपन्याही विकल्या जात आहेत. या देशाची धोरणं संसदेत बसलेले भांडवलदारांचे दलाल भांडवलदारांच्या सोयीनुसार आखत आहेत. त्या बदल्यात राजकीय पक्ष व पुढारी भरभक्कम रकमा व सोयीसुविधा उद्योगपतींकडून घेत आहेत. देशाला लुटून जमवलेला हा पैसा परदेशी बॅंकात, परदेशी उद्योगांत गुंतवला जात आहे. दुसऱ्या बाजूला या देशातील सर्वसामान्य जनता रात्रंदिवस मेहनत करुन आपला प्रपंच चालवता चालवता मेटाकुटीला आली आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या याने जनता हवालदिल झाली आहे. शिक्षणावर प्रचंड खर्च करुनही चांगल्या वेतनाची नोकरी मिळण्याची हमी नाही. उद्योगपतींची कोट्यावधीची कर्जे माफ होतात अन सामान्य माणसाकडून मात्र सक्तीने कर्जवसूली होते. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, चांगले जीवनमान या गरजा पूर्ण करता न आल्याने समाजात दरवर्षी अनेक लोक आत्महत्येचा मार्ग पत्कारत आहेत. कमालीच्या असुरक्षिततेच्या वातावरणात अन दहशतीत आपण जगत आहोत. इस्लामी आतंकवादाच्या धोक्यावर बोलताना आपल्याच देशातल्या लोकांनी चालवलेला हा ‘आर्थिक दहशतवाद’ आम्ही मुकाट्याने पचवणार का? त्याबद्दल ‘ब्र’ही काढणार नाही का?
भारतीय संविधानाने लोकशाहीचे तत्व स्विकारले. या देशाचा कारभार चालवण्यासाठी सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, सर्वांना आपले विचार, आपली मते मुक्तपणे मांडता आली पाहिजेत हे लोकशाहीचे मूलभूत तत्व आहे. पण आज देशाची व आपल्या महाराष्ट्राचीही सत्ता काही ठराविक घराण्यांपुरती मर्यादित आहे. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणाला घराणेशाहीची कीड लागलेली आहे. राजकीय पक्षांचे कंपनीकरण झालेले आहे. पैसा, मनुष्यबळ, पक्षांचे कॉर्पोरेट ऑफिसेस, हेलिपॅड्स, पक्षचिन्ह, पक्षाचा झेंडा, हवा भरुन फुगवलेले पक्षाचे नेतृत्व या सगळ्याचे अवडंबर पसरवून काही मूठभर लोकांनी सत्तेत एकाधिकारशाही निर्माण केली आहे. सामान्य माणूस मतदान करण्यापुरता किंवा फारतर राजकीय विषयांवर गप्पा मारण्यापुरताच राजकारणाशी जोडला गेला आहे. सामान्य माणसाचा प्रत्यक्ष सत्तेतला सहभाग अतिशय दुर्मिळ झालेला आहे. राजकीय पुढारी अन सामान्य जनता यांचे जगण्याचे स्तर प्रचंड वेगळे आहेत. राजकारणातल्या या गैरप्रकारांबद्दल बोलणाऱ्याला, पुढाऱ्यांचा विरोध पत्करणाऱ्याला अपमान, एकटेपणा, धमक्या याला सामोरे जावे लागत आहे, प्रसंगी प्राणालाही मुकावे लागत आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, रोहित वेम्युला हे अशाप्रकारच्या राजकारणामूळे प्राणास मुकलेले ठळक उदाहरणे आहेत. या आपल्याच देशातल्या ‘राजकीय दहशतवादाबद्द्ल’ आम्ही बोलणार की नाही? इस्लामी आतंकवादाचा निषेध, विरोध करीत असताना या राजकीय दहशतवादाचे आपण काय करणार?
इस्लामी दहशतवाद हा अमानवी, धोकादायक आहेच पण फक्त इस्लामी दहशतवादावर बोलून देशात धार्मिक ध्रूवीकरण करणे अन त्याद्वारे राजकारण करणे सोपे जाते. शिवाय खुद्द राज्यकर्त्यांनीच पोसलेल्या वर्ण-जातीच्या, आर्थिक अन राजकीय दहशतवादाला दुर्लक्षितही करता येते म्हणून सातत्याने इस्लामी दहशतवादाचे भय घालून इतर क्षेत्रातला दहशतवाद आमच्या पचनी पाडण्याचा कुटील डाव खेळला जातो.
मुंबई बॉंबस्फोट, २६/११ चा हल्ला, संसदेवरील हल्ला याने जेवढे बळी घेतले आहेत अन देशाचे नाक कापले आहे तेवढाच मोठा धोका देशातल्या वर्ण-जातीच्या, आर्थिक अन राजकीय दहशतवादाचा आपल्याला आहे. २६/११ ला बॉंब फुटले, गोळीबार झाला तसे वर्ण-जातीच्या दहशतवादाचे, आर्थिक दहशतवादाचे, राजकीय दहशतवाचे एवढेच काय लिंग विषमतेच्या दहशतवादाचेही अनेक बॉंब रोज आमच्या आजूबाजूला फुटत आहेत अन् अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करीत आहेत. निंदनीय असणाऱ्या इस्लामी दहशतवादाबद्दल तर आम्ही बोलूच, त्याविरोधात प्रसंगी आमच्या छातीचा कोटही करु पण या देशातल्या अनेक वर्षांपासूनच्या वर्ण-जातीच्या, आर्थिक विषमतेच्या, राजकीय एकाधिकारशाहीच्या, लिंगभेदाच्या दहशतवादाचे काय करायचे?
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)