
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : प्लॉट विक्रीस विरोध करणाऱ्या पत्नीच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू (पेव्हर ब्लॉक) मारुन तिला जीवे ठार मारणारा पती फरार झाला आहे. या दुःखद् प्रकाराने परभणीतील महात्मा फुले नगरात प्रचंड खळबळ माजली आहे.
या प्रकारामुळे भयभीत झालेल्या शेजारील लोकांनी मार लागून जखमी अवस्थेतील मंगला प्रधान (४०) यांना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले, परंतु उपचार करताना तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
घटनेची खबर लागताच कर्तव्यावरील सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू ठेवला, परंतु पोलीस येण्याअगोदरच फरार पतीने घटनास्थळावरून पोबारा केला होता. घटनेचे गांभीर्य ध्यानी घेऊन सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, पोलीस निरीक्षक पोलीस समाधान चौरे, पोलीस उपनिरीक्षक शिवकांत नागरगोजे व पोलीस कर्मचारी मनोज राठोड आदींनी घटनास्थळी जाऊन अधिक चौकशी व परिस्थितची पहाणी करीत गनिमी काव्याने चौकशीचा सिलसिलाही सुरु ठेवला होता तर दुसरीकडे घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱी श्री पुजारी यांना कांही महत्वपूर्ण निर्देश दिले.
नानलपेठ पोलिसांनी या प्रकरणी फरार पती शेषराव रामराव प्रधान याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. असं असलं तरी मागील काही कालावधीपासून शहरात कुठे ना कुठे तरी एका पाठोपाठ एक अशा खूनांची मालिका सतत सुरुच राहिली असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी पोलिसांचीही अशा प्रकारे शिगेला पोहोचणा-या या गुन्हेगारी रेषोमुळे चिंता अधिकच वाढली आहे. पोलीस मुख्यालय क्षेत्रात दिवसेंदिवस अधिकच वाढणाऱ्या गंभीर घटनांमुळे खाकी वर्दीचा अपेक्षित असणारा धाक कमी झालाय की काय, जणू अशीच चर्चा सर्वत्र होत असल्याचे बोलले जात आहे. कालांतराने आरोपी मिळतीलही, त्यांना सजा सुध्दा होऊन पुन्हा ते सुटले जातील यात शंकाच नाही परंतु अशा गंभीर घटनांमध्ये ज्यांचे जीव जातात ते थोडीच पुन्हा जीवंत होणार आहेत व येणार आहेत ? मुळात असे गुन्हे घडलेच जाणार नाहीत असा पोलीस व खाकीचा जबरी वचक गुन्हेगार व बोकाळलेल्या गुन्हेगारीवर बसला पाहिजे तर आणि तरच गुन्हेगारांना पळता भूई थोडी होऊन गुन्हेगारीलाही आळा बसू शकेल यात शंकाच नसावी.