
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी –
परभणी : महाराष्ट्र शासनाच्या उच्च समितीतर्फे मुंबई येथे बोलावण्यात आलेली विशेष बैठक अचानक रद्द करण्यात आल्यामुळे पाथ्रीच्या हजारो साई भक्तांची घोर निराशा झाली आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे पाथ्री येथील श्री साईबाबांचं देवालय आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे दिडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने शासनातर्फे एक उच्च समिती गठीत करण्यात आली आहे. त्या समितीतर्फेच सदर आराखड्यावर दि. १८ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित बैठकीमध्ये गंभीर चर्चा करण्यात येणार होती. तसे समितीतर्फे परभणी जिल्हाधिकारी व पाथ्री न.प.चे मुख्याधिकारी व मंदीर व्यवस्थापनाला निमंत्रण धाडून पाचारणही करण्यात आले होते. तथापि सदरची नियोजित बैठक अचानक रद्द करण्यात आल्याचे रात्री उशिरा संदेश आल्यामुळे कोणालाही तसे समजले नसावे. पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने काहीजण मुंबई येथे रवानाही झाले होते. मुंबईत गेल्यानंतर मात्र
बैठक रद्द झाल्याचे समजले.त्यामुळे साई भक्त पूरते हिरमुसले गेले. कदाचित सत्तांतर होऊन नवीन सरकार गठीत झाल्यामुळे किंवा पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे या विषयावर शासनाबरोबर उच्च समितीची चर्चा झाली नसावी किंवा अन्य दुसरे काहीही कारण असू शकेल तो भाग वेगळा परंतु कालांतराने का होईना आराखड्या संबंधी आयोजित बैठक रद्द करण्यात आल्यामुळे हजारो साई भक्तांची मात्र घोर निराशा झाली एवढे मात्र खरे ! दरम्यान या विषयीची पुढील तारीख जरी कळवली असती तर काही अंशी का होईना दिलासा तरी मिळाला असता.