
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : लोकेश राहुलला सलामीला येऊनही मोठी खेळी करता आली नाही. शिखर धवनने फॉर्म कायम राखताना दमदार खेळ केला, परंतु शुबमन गिल व इशान किशन यांची १४० धावांची भागीदारी महत्त्वाची ठरली.
लोकेश राहुल व शिखर धवन यांनी सावध सुरुवात करताना अर्धशतकी धावा फलकावर चढवल्या. १७ धावांवर असताना धवनचचा झेल सुटला. १५व्या षटकात ही भागीदारी तुटली. ब्रॅड इव्हान्सने कर्णधार लोकेश राहुलचा ( ३० धावा) त्रिफळा उडवला अन् भारताला ६३ धावांवर पहिला धक्का बसला. शिखरला ६८ चेंडूंत ४० धावांवर इव्हान्सनेच माघारी पाठवले. इशाननेही ६१ चेंडूंत वन डेतील त्याचे दुसरे अर्धशतक पूर्ण केले. वेस्ट इंडिज दौऱ्यावर शुबमनला ९८ धावांवर नाबाद असूनही पावसामुळे शतक पूर्ण करता आले नव्हते, परंतु आज त्याने ती सल भरून काढली. ९७ धावांवर असताना शुबमनसाठी LBW ची जोरदार अपील झाली, परंतु DRSमध्ये बॅट व बॉलचा संपर्क आल्याचे दिसले अन् शुबमन वाचला. पण, याच अपील दरम्यान धाव घेण्याच्या प्रयत्नात इशान ५० धावांवर रन आऊट झाला. शुबमन व इशान यांनी १२७ चेंडूंत १४० धावांची भागीदारी केली. दीपक हुडा ( १) इव्हान्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.
भारताकडून शतक झळकावणारा शुबमन हा १०२ आणि जगातला १०२२ वा खेळाडू ठरला. झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन ( १५) लगेच माघारी परतला. शुबमन २२ वर्ष व ३४८ दिवसांचा आहे आणि झिम्बाब्वेत शतक झळकावणारा तो भारताचा युवा फलंदाज ठरला. यापूर्वी रोहितने २३ वर्ष व २८ दिवसांचा असताना झिम्बाब्वेत शतक झळकावले होते. शुबमने १२३ धावा करताच हरारे येथे सचिन तेंडुलकरने २००१ मध्ये नोंदवलेला १२२ धावांची विक्रम तुटला. हरारे येथील ही भारतीय फलंदाजाची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. शुबमन ९७ चेंडूंत १५ चौकार व १ षटकार खेचून १३० धावांवर माघारी परतला. झिम्बाब्वेविरुद्ध ही भारतीयाची सर्वोत्तम खेळी ठरली आणि त्याने तेंडुलकरचा १९९८सालचा १२७* धावांचा विक्रम मोडला. झिम्बाब्वेच्या ब्रॅड इव्हान्सने पाच विकेट्स घेतल्या. भारताने ८ बाद २८९ धावा केल्या.