
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे : ठेकेदारांनी तीन महिन्यांपासून वेतन दिले नसल्याने पीएमपीच्या सुमारे ४०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी अचानक संप सुरू केला. यामुळे सायंकाळी कामावरून सुटलेल्या नागरिकांना घरी जाण्यासाठी तासन्तास बसची वाट पाहावी लागत होती.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये १६०० हून अधिक बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. यातील ३०९ ई-बस आणि ६०० सीएनजी बस ठेकेदारी तत्वावर धावत आहेत. बुधवारी निगडी, औंध, स्वारगेट आणि न.ता. वाडी डेपोतील ई-बस चालकांनी काम बंद आंदोलन करून वेतन मिळेपर्यंत बस न चालविण्याचा पवित्रा घेतला आहे.
पीएमपीच्या ताफ्यात पन्नास टक्के हून अधिक बस या ठेकेदारांच्या आहेत. ठेकेदार कधी त्यांना पीएमपीने पैसे दिले नाही म्हणून संप करतात, तर कधी कर्मचारी वेतन दिले नाही म्हणून संप करतात. यात सामान्य प्रवासी विनाकारण भरडला जात आहे. पीएमपी प्रशासन सर्वच काही ठेकेदारांना देणार असेल, तर भविष्यात नागरिकांना ठेकेदाराकडून त्रास होवू शकतो.