
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
वर्षभर राबणाऱ्या बैलांविषयी व्यक्त केली जाते कृतज्ञता; असा साजरा करतात पोळा.
भूम:- तालुक्यात ग्रामीण भागातील लोक मोठ्या प्रमाणात पोळा साजरा करतात. या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा करून मिरवणूक काढली जाते. ज्यांच्याकडे बैल नाहीत ते लोक घरात मातीच्या बैलांची पूजा करून हा सण साजरा करतात.महाराष्ट्रात दरवर्षी पिठोरी अमावस्येच्या दिवशी बैल पोळा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. या दिवशी बैलांना शेतीतील कामांपासून आराम दिला जातो आणि त्यांची काळजी घेतली जाते.
बैलपोळा साजरा करताना तरुणाई मध्ये उत्साह दिसून आला. यावेळी आदित्य माळी,अक्षय पाटील, निलेश मुळे, संजय गिलबिले,संतोष गिलबिले, विशाल नलवडे, बप्पा गिलबिले, नितेश गिलबिले तसेच समस्त आष्टा ग्रामस्थ ने सण उत्साहात साजरा केला.
कसा साजरा केला जातो बैल पोळा?
बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलांना नदीवर नेऊन उटणे आणि साबण लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते. त्यानंतर विविध रंगांनी त्यांना सजवले जाते. या दिवशी बैलांना आकर्षक वस्त्र आणि दागदागिने घालून त्यांची पूजा केली जाते. शेतकऱ्यासोबत वर्षभर शेतीची धुरा वाहणाऱ्या बैलांला पोळ्याच्या दिवशी विशेष मान दिला जातो. या दिवशी बैलाचे खांदे तुप आणि हळद लावून शेकले जातात आणि बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.