
दैनिक चालु वार्ता जिल्हा उपसंपादक-दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””
परभणी : वर्षभर शेतीमध्ये राब राब राबणाऱ्या बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावणी अमावास्येच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सजवून बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. त्यालाच बैल पोळा सण असे संबोधले जाते.
परभणी शहरातील मोठा मारुती मंदीर परिसरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात लगबग सुरु होती. मंदीराचा परिसर रंग रंगोटी करुन सजवण्यात आला होता. आज बैलांचा सण असल्यामुळे त्यांना भल्या पहाटेच शेतीमध्ये चरायला नेण्यात आले होते. साधारणतः अकरा-बारा वाजे दरम्यान पोटभर खाण्याची व्यवस्था करुन गावाकडे आणलेल्या बैलांना कोणी नदीमध्ये तर कोणी ओढ्याला किंवा तलावात नेऊन त्यांना चांगल्या प्रकारे अंग घासून आंघोळ घातली जाते. नदी-ओढ्याची किंवा तलावाची सोय नसेल तेथे याच बैलांना वेगवेगळ्या प्रकारे आंघोळीची सोय केली जाते. त्यानंतर त्यांच्या शिंगावर व उर्वरित अंगावर विविध रंगांची रंगरंगोटी केली जाते. त्यांच्या अंगावर रंगी बेरंगी झुली घातल्या जातात. शिंगावर विविध रंगीन ऊनीपासून बनवण्यात आलेल्या साहित्यांनी सजवले जाते. कवड्यांचा साज अंगावर चढविला जातो. पितळेच्या निरनिराळ्या घुंगुरमाळा, घंट्या गळ्यात घातल्या जातात. कासरा, म्होरक्या, वेसन इत्यादी साहित्य जे वर्षभर वापरले जाणार असते ते यावेळी एकदम नवीन कोरे उपयोगात आणले जाते. सजवून झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या बैलजोड्या तैनात ठेवतात. कोणी कोणी हवेसे गवसे नवसे तर आपल्या बैलांना मारुतीच्या पाराभोवती वेडे घालतांना स्फूर्ती यावी म्हणून गोड्या किंवा एरंडी तेलाच्या बाटल्या न् बाटल्या पाजतात.
मानाची मानकरी असलेली बैलजोडी सर्वप्रथम फिरायला उभी करुन त्या पाठोपाठ समस्त गावकरी सजवलेली आपली बैलं मोठ्या दिमाखात पाच पाच किंवा दहा दहा फे-या फिरवत असतात. त्यानंतर त्यांना घरी नेऊन त्यांची प्रथम पाय धुऊन, हळदी-कुंकू लावून भक्ती भावाने पूजा केली जाते. त्यांना निरंजन लावून ओवाळले जाते आणि मग त्यांचे विधीवत लग्न लावले जाते. त्यानंतर पुन्हा मारुतींना फे-या मारायला नेले जाते. मग फिरुन आल्यावर पुरण-पोळी, भात शिवाय आणखी जे काही गोड धोड बनवलेले जेवण त्यांना ताटामध्ये खायला दिले जाते किंवा भरविले जाते. कधी तरी एखादा बैल जेवण खाण नसेल तेव्हा बिचारा रुसला आहे, असेही बोलले जाते. त्यानंतर घरातील परिवाराचे जेवण झाल्यानंतर घरातील ज्येष्ठ व्यक्ती प्रत्येकांच्या घरी जाऊन गळामिठी व नमस्कार करीत गावभर फिरतात.
वर्षानुवर्षे शेतीत राबणाऱ्या व बळीराजाच्या आयुष्यात बैलांना फारच महत्व असते. खाद्यांना तेल लावून मालीस केलेल्या बैलांचे शेतीप्रधान देशात खूपच महत्व आहे. आज शुक्रवार रोजी श्रावणी अमावास्येच्या औचित्यावर बैलांच्या प्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच बैल पोळा हा सण मोठ्या दिमाखात, वाजत, गाजत साजरा केला गेला आहे.