
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडल्याची माहिती समोर आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली आहे. ईडीने अटक केल्यावर त्यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली. मात्र, अटकेत असल्यापासून त्यांना अनेक शारीरिक समस्यांचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता अनिल देशमुख हे आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जेलमध्ये असताना अनिल देशमुख यांच्या छातीत दुखू लागले. त्याच दरम्यान ते चक्कर येऊन पडले. चक्कर येऊन पडले आणि छातीत दुखू लागल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुख यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. यानंतर जेलमधील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी जेजे रुग्णालयात हलवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांना आणखी काही दिवस जेजे रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अनिल देशमुख हे महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचे गृहमंत्री होते. मात्र, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रामुळे एकच खळबळ उडाली. 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर त्यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांनाही अटक करण्यात आली. तर अनिल देशमुख यांनाही अटक झाली. नोव्हेंबर महिन्यात अटक करण्यात आलेले अनिल देशमुख हे अद्यापही जेलमध्येच आहेत.