
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. पुण्यातील चांदणी चौक परिसरामध्ये उड्डाण पुलाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार यावेळी पुणेकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. विशेष म्हणजे ताफा अडकल्याने आणि त्याचवेळी स्थानिकांनी शिंदेंकडे तक्रार केल्यानंतर तातडीने त्यांनी या तक्रारीची दखल घेतली. दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील विद्यापीठ चौक आणि चांदणी चौकातील रेंगाळलेले उड्डाण पुलांचे काम, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि पुणेकरांना होणारा त्रास याबाबत गुरुवारी थेट विधिमंडळातच प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आता थेट या विषयावरुन मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवून त्यांच्याकडे वाहतूक कोंडीची तक्रार स्थानिकांनी केल्यानंतर त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना फोन केला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता स्पाॅटवर हजर राहावे असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वहातूक पोलिस अधिकाऱ्यांना दिला. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार या भागात नेहमीच वहातूक कोंडी होते आणि त्याचा त्रास वाहन चालकांना व नागरिकांना होतो.