
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:संततधार पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीन, मुग, उडीद ही पिके हाती लागण्याची आशा होती. या पिकांना फळ धारणा झाली, परंतु पावसाअभावी ही पिके करपून जात आहेत. पाऊस पडला नाही तर उरलेली पिके वाया जाण्याच्या मागांवर आहेत. गेल्या १५ दिवसांपासून उन्हाळ्यासारखी गरमी जाणवत आहे. श्रावण मास संपला असून मधा नक्षत्र पुर्णपणे कोरडे गेले. आता पुर्वा नक्षत्रातील पावसाची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. गणेशोत्सवा दरम्यान चांगला पाऊस पडतो. उरलेली पिके हातची जाऊ नयेत यासाठी शेतकरी प्रार्थना करीत आहेत. मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे बहुतांश व्यवहार केवळ खरीप पिकांवर अवलंबून असतत. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर सुरु झालेला पाऊस पुढे थांबला नाही. यामुळे खरीपाची पिके वाया गेली. यावर्षी मुखेडतालुक्यात आतापर्यंत ७५० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पर्जन्यमान ८८९ मि. मी. आहे. खरिप हंगामात कापूस, ज्वारी, तूर, मूग,
उडीद, सुर्यफुल, सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. तालुक्यात ७७ हजार ८८९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली असून सर्वाधिक ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. यावर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने सोयाबीनचा पेरा वाढला आहे. सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळावे यासाठी शेतकरी उधारी उसनवारी करून खते, बी-बियाणे खरेदी करुन वेळ प्रसंगी फवारणी करून सोयाबीन पिकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरु आहे. पिक बहरात असताना उन्हाचा तडाखा व पावसाने खंड दिल्याने हे पिके कामेजून जात आहे. बाहाळी, मुक्रमाबाद, जांब, चांडोळा, एकलारा बु. जाहूर, वेक्ती या मंडळात पीके करपू लागली आहेत. सोयाबीन, मूग, उडीद या पिकांना शेंगा लागत आहेत. काही ठिकाणी पिके फुलचट्यात आहेत. ज्वारी सुद्धा बहरू लागली असताना पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे ही पिके शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाहीत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्या अश्रू तरळत आहेत. स्वतः च्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढविलेली पीके पावसाअभावी कोमेजली जात असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काही शेतकऱ्यांनी तुपार ठिबक सिंचनाद्वारे विहीरी बोअरमधील पाण्याने पिके वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला आहे. येत्या काही दिवसात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे. तो पडला नाही तर खरीप हंगाम हातचा जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा करण्याशिवाय गत्यंतर नाही.