
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक-दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : महापालिका क्षेत्रांतर्गतच्या प्रभाग क्रं. ३ मधील विविध विकास कामांसाठी श्रीमती फौजिया खान यांनी आपल्या खासदार फंडातून रुपये एक कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
परभणी येथील राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार श्रीमती फौजिया खान यांनी विविध नागरी विकास कामांवर लक्ष केंदीत केले आहे. समाजाप्रति असलेली बांधिलकी जोपासत खा. फौजिया खान यांनी नागरी विकास करणे हे आपले कर्तव्यच असल्याचे सांगितले. शहरांतर्गत नाली, गटार, फूटपाथ, रस्ते आदी कामे लहान लहान दिसत असली तरी ती एक आपली बांधिलकीच आहे. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, लोकप्रतिनिधी ही व्यक्ती सुध्दा एक लोकसेवक म्हणूनच सदैव कार्यरत राहिली पाहिजे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी परभणी शहर व परिसरात आतापर्यंत बरीच लोकहिताची कामे केली आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या अत्यंत विश्वसनीय म्हणून खा. फौजिया खान यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्र विधानसभेतील विद्यमान विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याशीही त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी असलेले राजनैतिक व मैत्रीपूर्ण संबंध फौजिया खान यांना राज्यसभेतही नेहमीच उपयुक्त राहिले आहेत.
प्रभाग ३ मधील रस्ता, नाली, फूटपाथ व पार्किंग यांसारख्या कामांसाठी हा निधी वापरला जाणार आहे. त्याशिवाय आणखी जी काही नागरी विकास कामे करणे आवश्यक आहे, ती सर्व पार पाडली जातील असा विश्वास श्रीमती खान यांनी व्यक्त केला आहे. याच्याही पुढे जाऊन सांगायचे झाल्यास शहरात आणखी कुठे एखादा मोठा प्रकल्प किंवा विकासाभिमुख असे काम करायचे झाल्यास त्यासाठी लागणारा निधी सुध्दा अन्य कोणत्याही मार्गाने आणला जाईल याची तयारीही श्रीमती खान यांनी व्यक्त केली आहे. एकूणच खा. फौजिया खान यांचे समाज व परभणीत चांगले वजन आहे. म्हणूनच की काय, समाजाच्याही त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत.