
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा- शाम पुणेकर.
पुणे: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राज्याचे नवे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका दौऱ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या तानाजी सावंत यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यांची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तानाजी सावंत यांना डिवचले आहे. त्या पुण्यात आल्या असताना त्यांना आदित्य ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याविषयी विचारणा करण्यात आली. यावर नीलम गोऱ्हे यांनी तानाजी सावंत यांचे नाव न घेता टोला लगावला. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा हा काही गुप्त नसेल. तसेच हा दौरा घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर इतक्यापुरताच मर्यादित नसेल, अशी खोचक टिप्पणी गोऱ्हे यांनी केली. त्यामुळे आता यावर तानाजी सावंत काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अलीकडेच तानाजी सावंत यांच्या पुण्यातील दौऱ्याचा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालयाकडून जाहीर करण्यात आला होता. मात्र, या दौऱ्याचा तपशील पाहून अनेकांना हसू फुटले होते. दौऱ्याच्या कार्यक्रमात नमूद केल्याप्रमाणे तानाजी सावंत यांच्या दौऱ्यानुसार शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता आपल्या कात्रजच्या निवासस्थानी पोहोचणार होते. त्यानंतर शनिवारी सकाळी ११ वाजता ते कात्रज निवासस्थानाहून निघून बालाजी नगर येथील कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत उपस्थित राहतील. तर ३ ते ५ या वेळेत बालाजी नगर येथील कार्यालयातून निघून कात्रज येथील कार्यालयात जातील. ५ ते ८ या वेळेत पुन्हा कात्रज कार्यालय ते बालाजी नगर कार्यालयात जातील. रात्री ८ वाजता बालाजी नगर कार्यालयातून निघून आपल्या कात्रज येथील निवासस्थानी जातील, असा एकंदरीत चमत्कारिक दौरा पाहून सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर अशा दौऱ्याने तानाजी सावंत यांची चांगलीच नाचक्की झाली होती.
याच १०×१० च्या कार्यालयातूनच मी कोव्हिड काळात मदतीची कामे केलीत असा तपशील जाहीर करत तानाजी सावंत यांनी घर तेल कार्यालय हा आपला दौरा किती महत्त्वाचा होता, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता.
— न्यूज नेटवर्क