
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक-दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे उद्या मंगळवार, दि. ३० ऑगस्ट २२ रोजी भव्य अशा ट्रॅक्टर मोर्चाची धडक दिली जाणार आहे. अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दिली.
पालम आणि गंगाखेड या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांतर्फे संयुक्तरित्या हा मोर्चा काढण्यात येणार असून त्याची पूर्व तयारी कशी असावी, त्यासाठी काय करणे गरजेचे आहे, शिवाय त्यासाठी पाळावी लागणारी कायदेविषयक चाकोरी, अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शनपर बैठक सोमवार, दि. २९ ऑगस्ट २२ रोजी सकाळी ठिक साडे अकरा वाजता गंगाखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर्स घेऊन या मोर्चात सहभाग घ्यावा, जेणेकरुन शेतकऱ्यांची मजबूती, एकता व ताकद प्रशासनाला दिसून आली पाहिजे, प्रशासन हबकले पाहिजे याविषयीचे मार्गदर्शन केले जाणार आहे. मागण्या नेमक्या काय आहेत, हे जरी समजले नसले तरी पुढील विषयांचा नक्कीच उहापोह होईल असे सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कळते आहे. पर्जन्यवृष्टी काळात शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान, पिकांचे न झालेले पंचनामे, आत्महत्याग्रस्त शेतकरी मदती पासून वंचित, ऊस व ऊसतोड कामगारांच्या समस्या या व अशा अनेक समस्यांमुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग पूर्णपणे कोलमडला गेला आहे. आर्थिक विवंचनेमुळे तो मेटाकुटीला आला आहे. तथापि शासन-प्रशासन अद्यापही निद्रीस्तावस्थेत असल्यासारखेच वावरत आहे.
मंगळवार, दि. ३० ऑगस्ट २२ रोजी सकाळी ठिक ११ वाजता नियोजित मोर्चा परभणीच्या वसमत रोडवरील संत तुकाराम कॉलेजच्या प्रांगणातून निघून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहे.