
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:येथील आगारातील बस चालक एच. एम. नरहरे यांना बसमध्ये चढण्यावरून मारहाण केल्याप्रकरणी नरंगल येथील अजिंक्य यशपाल देशमुख यांना देगलूर पोलिसांनी ३० ऑगस्ट रोजी रात्री अटक केली होती. त्यांना ३१ रोजी येथील न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १४ दिवसाची म्हणजेच येत्या १३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.मंगळवार ३० ऑगस्ट रोजी देगलूरच्या नवीन बसस्थानकावरून देगलूर आगाराची बस उदगीरकडे जाण्यासाठी थांबली होती. बऱ्याच वेळेनंतर गाडी लागल्याने प्रवाशांनी बसमध्ये चढण्यासाठी मोठी गर्दी केली. त्याचवेळी एक दिव्यांग व्यक्ती बसमध्ये चढत असल्याचे लक्षात आल्यानंतर बस चालक एम. एच. नरहरे यांनी प्रवासी अजिंक्य यशपाल देशमुख रा. नरंगल यांना त्या दिव्यांग व्यक्तीला आधी बसमध्ये येऊ द्या, असे म्हणताच अजिंक्य देशमुख व बस चालक यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीपर्यंत गेले. चालकाने बस पोलिस स्थानकात नेऊन फिर्याद दिल्याने देगलूर पोलिसांनी आरोपी अजिंक्य यशपाल देशमुख रा. नरंगल यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला व रात्रीच आरोपीला ताब्यात घेतले. ३१ रोजी अजिंक्य देशमुख यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे…