
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अमरावती जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यामद्धे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून फळबागा,फुलबागा पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.अंजनगाव सुर्जी तालुक्यात अतिवृष्टीमुळे संत्रा पिकाचे नुकसान झालेले शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,या मागणीसाठी दि.३० ऑगस्ट २०२२ रोजी तहसीलदार अभिजित जगताप व कृषी अधिकारी तराळ यांना प्रहार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठया प्रमाणावर संत्रा उत्पादक शेतकरी आहेत.आंबिया फळबहर गळतीचे मोठे संकट बळीराजावर अतिवृष्टीमुळे निर्माण झाले आहे.त्याचबरोबर उन्हाळ्यातील जास्त तापमानामुळे मृग बहर सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून गेला.निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.अश्या बिकट परिस्थितीत बळीराजाला आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी मंगळवारी प्रहार संघटनेच्या वतीने तालुका स्तरावरील प्रशासन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.आता शासन कितपत शेतकऱ्यांना मदत करणार ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवेदन देतेवेळी प्रहार युवक तालुकाध्यक्ष निलेश चोपडे,योगेश डोबाळे,भास्कर हुरबडे,अमोल हुरबळे,अमोल निमकाळे,अजिंक्य गावंडे,विकी हूरबडे आदी प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.त्याचबरोबर तात्काळ पाठपुरावा करून मदत मिळाली नाही तर उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा यावेळी प्रहारच्या वतीने शासन तथा प्रशासनाला देण्यात आला आहे.