
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय कराळे
———————–
परभणी : पनवेल महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत तृप्ती सांडभोर यांची राजकीय समिकरणाची रास जुळून आली नसावी म्हणून नांदेड येथे झालेली बदली औटघटकेची ठरवून त्यांना परभणी येथे रुजू होण्याचे फर्मान धाडले गेले. पनवेल टू परभणी ही रास जुळवून आणतांना अगोदर नांदेडला केलेली बदली राजकीय दबावापोटी रद्द करवून तृप्ती सांडभोर यांना बदलीवर पाठवण्यात अखेर ज्यांनी प्रयत्न चालविले तेच अखेर खरे ठरले की ठरवले गेले हे मात्र लवकरच कळून आल्याशिवाय राहणार नाही. राजकारणात वशिल्याचे टट्टू ज्यांचे बळकट असतात त्यांचीच डाळ मनाजोगती शिजते असे पूर्वापार चालत आलेले आहे, तेच अगदी खरे असावे.
असो, तृप्ती सांडभोर यांना परभणीच्या आयुक्तांचा पदभार लवकर स्वीकारुन तसा अनुपालन अहवाल त्वरीत सादर करावा असे महामहीम राज्यपालांच्या आदेशान्वये अवर सचिव अ. का. लक्कसे यांच्या सहीने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यांनी पदभार स्वीकारला नसला तरी हे वृत्त छापून येईपर्यंत तरी त्यांनी तो स्वीकारलेला असेल एवढे नक्की.
तसे झाल्यास तृप्ती सांडभोर यांना मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नसावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास खाते असले तरी त्याच खात्याद्वारे राज्यपाल यांच्या नावे व आदेशाने तृप्ती सांडभोर यांच्यासाठी काढलेला तो आदेश नांदेड साठी औटघटकेचा ठरवून परभणीला रुजू होणे भाग पाडले, हा सुध्दा राजकीय संशोधनाचा भाग ठरु शकेल यात शंकाच नसावी.
परभणीच्या आयुक्तपदी असलेले देवीदास पवार यांचा सेवा कार्यकाळ बहुतांश शेवटच्या टप्प्यात असावा त्यामुळे त्यांची सेवा कालमर्यादाही परभणीत संपूष्टात येईल असे वाटले होते तथापि त्यांच्याही नशीबाचा कोणाची तरी काळी नजर लागली असावी म्हणूनच की काय शेवट परभणीत न होता तो प्रवास अमरावती पर्यंत वाढवून कोणी तरी अज्ञात मान्यवर मनस्वी आनंदी झाले असावेत असेही बोलले गेल्यास वावगे ठरु नये. येणारा काळ आणि करावी लागणारी सेवा कोणते रुख दाखवून देईल यांचा अंदाज व नियोजित आराखडे कधीच ठरवता येत नाहीत हे सुध्दा शेवटी नशीबावरच अवलंबून असू शकते एवढे मात्र खरे.
तृप्ती सांडभोर यांचा कार्यकाळ कितीसा असावा, हे नक्की अवगत नसले तरी जो काही परभणीतला कार्यकाळ राहिला जाईल, तो आव्हान आहे अशीच खूनगाठ बांधून, नव्हे नव्हे येथल्या जनतेशीच आपली बांधिलकी आहे असे समजून येतील ती आव्हाने स्वीकारून परभणीच्या सर्वांगीण विकास सेवाभावी वृत्तीने व निष्ठेने पार पाडावा हीच अपेक्षा चालू वार्ता या मराठी दैनिकातर्फे केली गेल्यास मुळीच आश्चर्य वाटणार कामा नये. कारण आम्ही पत्रकार असलो तरी आमचीही नाळ परभणीच्या विकासासाठी जुडलेली आहे. किंबहुना त्याच भावनेने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी नुकतेच एक जाहीर अनाहूत पत्र लिहून आमच्या भावना त्यांनाही कळविल्या आहेत.
परभणीच्या जिल्हाधिकारी पदी सुध्दा एक कार्यतत्पर महिलाच आहेत. आंचल गोयल त्यांचे नाव असून काम करण्याची हातोटी व सच्चोटी ती काय व कशी असते हे त्यांना चांगलेच अवगत आहे. आपणही त्यांच्या सल्ल्याने व सहकार्याने मनोभावे व अगदी जिद्दीने जनसेवेचे काम पार पाडलेत तर मात्र परभणी शहराचा विकास काहीच दूर राहिला जाणार नाही, असा विश्वास बाळगायला मुळीच हरकत नसावी. आपले सहकारी अधिकारी, कर्मचारी, राजकारणी, लोकप्रतिनिधी व पत्रकार यांचे अनुभव, विचार प्रसंगी कायद्याच्या कक्षेत जे चाकोरीबद्ध असू शकेल ते अवगत केल्यास व अंमलात आणल्यास नक्कीच दुरावा न ठेवता सलोखा वाढू शकेल अशी आवशक्यताही फार गरजेची असू शकते. अखेर निजामकालीन महापालिकेचे भवितव्य आणि विकासाचे तंत्र आपल्याच हाती राहिले जाणार आहे एवढे नक्की.