
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-
सकळ विघ्नांचा तारणहार, संकटांचा निवारण करणारा, विद्येची देवता, चौदा विद्या आणि चौसष्ठ कलेचा देव म्हणून ज्यांची ख्याती आहे, अशा या गणरायांचे आगमन मोठ्या धुम धडाक्यात, ढोल-ताशांच्या निनादात आणि हर्षोल्हाशात झाले. कोणाच्या घरी दीड दिवसाचे, कोणाकडे पाच दिवसांचे, कोणाकडे गौरी बरोबरचे आणि तिथीनुसार दहा किंवा अकरा दिवसांसाठी येतात ते सार्वजनिक मंडळांचे…असे गणराय येऊन आजचा चवथा दिवस उजाडला. ज्या आनंदाने, भक्तीभावाने, हर्षोल्हाशात, ढोल-ताशांच्या निनादात वाजत गाजत आणले त्या बाप्पांची विधीवत पूजा-अर्चा, दुपारी आणि संध्याकाळी आरत्यांची गुंजनही मोठ्या श्रध्देने केली जाते. किंबहुना त्याच श्रध्देने विसर्जनही त्याच थाटात होत असते. मुंबई, पुण्यासारख्या शहरात तर संबंध दिवस आणि रात्रभर डोळ्यांचं पारणं फिटलं जाईल अशा भव्य नि आकर्षक अशा मिरवणूका काढल्या जातात. अथांग अशा समुद्रात त्यांचे मोठ्या भक्तिभावाने विसर्जन केले जाते. ओसंडून वाहणारा जनसागर अगदी नजर जाईल तिथपर्यंत विखुरलेला दिसत असतो. परंतु तेच विसर्जन परभणी शहर किंवा लगतच्या तालुके, शहरे व सर्व परिसरांत त्या तुलनेने अजिबात चांगले केले जात नाही, असेच बोलले जाते आहे. नद्या, खळखळ पाणी वाहणारे वारे असूनही त्यात विसर्जन न करता ते वर्षानुवर्षे कचरा साठविले जाणाऱ्या सुक्या विहिरींमध्ये केले जाते असे समजते. ज्या ठिकाणी पावसाबरोबरच आजुबाजुला असलेली. दुकाने, हॉटेल्स, घराघरांतून सोडलेले घाण पाणी साचले जाते, अशा ठिकाणी केले जाणारे विसर्जन म्हणजे अत्यंत निंदनीय अशीच बाब म्हणावी लागेल. निषेधार्ह म्हणावे लागेल. तसे काही नसते तर पूर्णा सारख्या तालुका शहरात त्या प्रकाराबाबत कोणी आवाजही उठवलाच नसता. जर असा घाणेरडा प्रकार होणार असेल तर मात्र जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी तातडीने लक्ष घालून असले किळसवाणे प्रकार बंद केले जावेत यासंबंधीचे निर्देश त्या त्या तहसीलदारांना त्वरीत द्यावेत, अशी आर्त मागणी समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय वामनराव कराळे यांनी केली आहे. कोणत्याही घाणीत किंवा घाण पाण्यात विसर्जन न करता घरासमोर, परिसरात किंवा विभागात शक्य तेवढ्या आकारांची जलाशये निर्माण करुन त्यातच ते विसर्जन केले पाहिजे अन्यथा ते महापाप असेच होईल.
तशा प्रकारची निर्माण जलाशये स्वच्छ पाण्यानी भरुन ठेवावीत. त्यांना चारही बाजूंनी नवीन कपड्याने गुंडाळून सजविले पाहिजे. बाहेरुन सर्वत्र निरनिराळ्या फुलांच्या माळांनी ती जलाशये सजवली गेली पाहिजेत. जलाशयातील त्या स्वच्छ पाण्या फुलांच्या पाकळ्या करुन टाकल्या पाहिजेत. विधीवत पूजा-अर्चा, आरत्या करणे आवश्यक आहे. तर आणि तरच माल दीड दिवसांची, पाच दिवसांची, गौरी बरोबरच्या व दहा दिवशीय विसर्जनाची मनोभावे केलेली भक्ती पूर्णपणे फळाला येऊ शकते. त्यातच खरे पावित्र्य राखले जाईल असेही दत्तात्रय कराळे यांनी म्हटले आहे.
पूर्णा शहरात, तालुक्यातील काही गावांमधूनही काही ठिकाणी अशा प्रकारचे विसर्जन केले जाणार असल्याची टीका मोठ्या प्रमाणात केली जात आहे. तसे होणार असेल तर त्वरीत थांबवले गेले पाहिजे, अन्यथा अनर्थ होईल यात शंकाच नसावी.
गणरायांच्या आगमनापूर्वीच भव्य असा देखावा उभारला जातो. पर्यावरणपूरक व आकर्षक असा आरास देखावा निर्माण केला जातो तर कुठे निरनिराळ्या आशयाचे देखावे केले जातात. भाविक भक्त, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रेक्षक यांच्या आनंदात उत्साहाचे भरते आले पाहिजे यासाठी विविध सामाजिक संस्था, मंडळे, नामांकित व्यक्ती आणि शासन, प्रशासनातर्फे मोठमोठे पुरस्कार देऊन त्यांना गौरविले जाते. त्याचीच परिणीती म्हणून प्रत्येकामध्ये सजावटीची स्पर्धा वाढीस लागली जाते. त्यामुळे कुठे शेकडो तर कुठे हजारोंच्या संख्येतील भाविक भक्तांच्या रांगा दर्शनासाठी कित्येक तास लागल्या जातात. भव्य अशा आराशींचे देखावे, आकर्षक सजावट व विद्युत रोषणाईने नटलेली अशी गणेशोत्सवाची मंडपं सुरक्षित राहिली जावीत यासाठी मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, होमगार्डस्, पोलीस सदैव तैनात ठेवली जातात. घर, परिवार, आप्तेष्ट, आपल्या घरचे गणपती यांच्यापासून ही दूर राहून ते सर्वजण दिलेल्या कर्तव्याची पूर्ती अगदी निष्ठेने पार पाडतात. विद्युत मंडळाचे अधिकारी व कर्मचारी सुध्दा त्यासाठी सहकार्य करीत असतात. स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत असतात. प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी सुध्दा सहकार्याच्या भावनेनेच वागतात. एरव्ही सहकार्य न करणारेही यावेळी मात्र न मागता ते करतात, यांचे कारण म्हणजे गणपती बाप्पांप्रति असलेली निस्सीम भक्ती. सर्व गणेश मंडळे, परिसर गोड, मधूर, मंजूळ अशा धार्मिक गाण्यांची धून सतत ऐकावयास मिळते. सनई, चौघडे, ढोल ताशांचा निनाद आणि भक्तीमय वातावरण भाविक भक्तांनी अगदी फुलून निघत असते.
डोळ्यांचे पारणे फिटेल असा सारा भक्तीचा मळा तब्बल दहा दिवस अगदी न चुकता आपण किती स्फुर्तीने बघत असतो, मग विसर्जनाच्या वेळीच असा दूराग्रह ,निष्काळजीपणा, कटू भावना का करतो, हेच कळत नाही. समारोह काळात वारंवार दर्शन घेऊन अंगिकारले ली भक्ती फळाला यावी म्हणून पूण्य कर्मात सातत्य टिकवून न ठेवता वर्षानुवर्षे साठला जाणारा कचरा, पावसाचे साचलेले व घराघरांतून आणि दुकाने, हॉटेल्स मधले घाण पाणी जेथे साचले जाते अशा विहिरी, डबके किंवा खड्डे अशा ठिकाणी केले जाणारे श्रीं चे विसर्जन महापाप नाही का ? दहा दिवसांचे पूण्यकर्म फळाला येण्याऐवजी जाणीवपूर्वक पापात का ढकलायचे यांचा कोणी विचार करणार का नाही ? तसे नसते तर परभणी जिल्हा व पूर्णा शहरातील नागरिकांनी हा विषय चव्हाट्यावर आणलात नसता. असे निंदनीय व निषेधार्ह प्रकार जर होणार असतील तर मात्र जागरुक नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना तसे प्रकार कुठेही आढळून आले तर मात्र नजिकच्या पोलीस ठाण्यावर तात्काळ तक्रार दाखल करणे गरजेचे आहे. पोलीसही गणरायांना मानणारेच आहेत. ते सहकार्य केल्याशिवाय राहणार नाहीत, यांचा नक्कीच विश्वास आहे. प्रशासकीय यंत्रणेलाही जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी तात्काळ निर्देश देऊन घाणेरड्या ठिकाणी विसर्जन केले जावू नये यासाठीचे पालन तंतोतंत केले जावेत अशा आशयाचे पत्र पाठवेत ही विनम्र प्रार्थना राहील.
सामाजिक संस्था, मंडळे, नामांकित व्यक्ती आणि नगरसेवक, आमदार, खासदार यांसारख्या लोकप्रिय नेत्यांनी सुध्दा या प्रकरणी दक्षता घेऊन तसे प्रकार कुठेही होणार नाहीत याबाबतचे निवेदन केल्यास मोठा अनर्थ टळू शकेल. समाजाप्रति असलेली बांधिलकी जोपासतांना जाणीवपूर्वक भक्ती मार्गात आणले जाणारे अडथळे ही दूर करणे आपले सर्वांचेच कर्तव्य बनले जाते. आपण जसे समाजाचे पाईक आहोत,तसेच देवाचे ही निस्सीम भक्त आहोत याची भावनाही प्रत्येकाच्या मनी तेवत राहिली पाहिजे, नव्हे आपला हा परमोच्च धर्मच आहे. तर आणि तरच आपली निस्सीम भक्ती फळाला येऊ शकेल ज्यामुळे विसर्जनाचे पावित्र्य कायम राखले जाईल असा विश्वास बाळगून प्रत्येकांच्या सेवेशी विनम्र आवाहन करीत आहे.