
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यातील वादावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. बुधवारी या प्रकरणासंदर्भात महत्त्वाचा कौल दिला जाण्याची शक्यता असून तसे संकेत नवे सरन्यायाधीश यू.यू.
लळित यांच्याकडून देण्यात आले आहेत.
या प्रकरणाचे कामकाज लांबत आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला कोणताही निर्णय घेण्यास मज्जाव केल्याबद्दल आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण घटनापीठाकडे वर्ग झाले आहे. मग निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती कशी दिली जाऊ शकते? असा सवाल शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाचे कामकाज अशाप्रकारे थांबवू शकत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यास परवानगी द्यावी, असा युक्तीवाद करत शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
यावर सरन्यायाधीशांनी म्हटले आहे की, यावर आत्ताच काही ठोस सांगू शकत नाही. या मुद्द्याचं काय करायचं यावर उद्यापर्यंत काही ठरवू. त्यामुळे आता बुधवारी सर्वोच्च न्यायालय शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादासंदर्भात निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाला परवानगी मिळणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.