
दैनिक चालू वार्ता टीम परभणी-
परभणी : वसमत तालुक्यातील सोन्ना ते हट्टा या सुमारे पाच कि.मी. अंतरादरम्यानच्या रस्त्याची भयान दूरावस्था झाली असल्याने पायी रहदारी करणारे शेकडो विद्यार्थी हतबल झाले आहेत. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे चिखल झालेल्या या रस्त्यावरुन वाळूच्या टिपरची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. अवजड वाहनांमुळे ओली माती दबली जावून अक्षरशः टायर त्यात घुसले जातात. परिणामी फूट-दीड फूटाच्या त्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले जाऊन कमालीचा चिखल बनला जातो. त्यातूनच हतबल विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते.
वाळू वैध असते का अवैध, हा पोलीस व महसूल खात्यांतर्गत संशोधन व कारवाईचा भाग आहे. तथापि जे लोक मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक करतात, ते एक धंदा व कमाईचे साधन म्हणून करतात. त्याचा फायदा ते खूप मिळवतही असतील परंतु विद्यार्थ्यांना त्याचा त्रास का दिला जातो, असेच कोणालाही वाटणे स्वाभाविक आहे. “उपभोग घ्यायचा एकाने अन् त्रास सहन करायचा दुसऱ्याने” हे किती दिवस आणि का चालणार ? असा रोकडा सवाल संतप्त विद्यार्थ्यांनी विचारला तर चुकीचंही ठरणार नाही. प्रशासनाकडून याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे नाही का ? फायदाच घेणे असेल तर रस्त्याची दुरुस्ती व देखभाल सुध्दा करायला हवे. वाळू साठवणारे मालक तथा धक्के मालक आणि वाहन धारकांनी रहदारीस त्रासदायक ठरणारा हा रस्ता सुधारणे व त्याची देखभाल करणे आवश्यक नाही का ? डोकं भेदून टाकणारा असा सवाल वाळू उद्योग व्यावसायिकांना अडचणीचा वाटत असला तरी ज्यांना खस्ता हाल सोसावे लागतात, त्यांच्या दृष्टीने मात्र योग्यच असावा असं मानायला काहीच हरकत नाही. आपलं कर्तव्य आणि सामाजिक बांधिलकी म्हणून दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशी समाजसेवा जर वाळू मालक आणि टिपर धारकांनी अंमलात आणली तर कोणी टीका टीप्पणी न करता धन्यवादच देतील, एवढे नक्की.
सोन्ना ते हट्टा हा रस्ता सुमारे पाच कि.मी. लांबीचा असून त्यापैकी तीन कि.मी.अंतराचा रस्ता खूपच खस्ता हाल झाला आहे. याच रस्त्यावरुन सोन्ना येथून शेकडो विद्यार्थी शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी हट्टा येथे ये-जा करीत असतात. सोन्ना या गावाजवळूनच पूर्णा नदी वाहत आहे. या नदी काठावरच मोठ्या प्रमाणात रेती साठा केला जातो. शिवाय याच नदीतून जो रेती उपसा केला जातो, तो अधिकृत लिलावाद्वारेच केला जातो अशी अधिकृत माहिती आहे. शासनप्रणाली व नियमांनुसार होणारा उपसा व नदीकाठावर केला जाणारा साठा असला तरी ज्या रस्त्याने रेतीची वाहतूक टिपर किंवा हायवासारख्या वाहनांद्वारे केली जाते, तो रस्ता केवळ आपल्यासाठीच नसून तो ज्यांना त्रासदायक ठरला जातोय त्या विद्यार्थ्यांसाठी सुध्दा आहे, हे विसरुन चालणार नाही. याचेही स्मरण सदरहू वाळू मालकांनी व वाहनधारकांनी ठेवायला हवे होते. तसे केले असते तर कोणालाही त्रास झाला नसता किंवा कोणी तक्रारीवजा डांगोराही पिटला नसता. रेतीचा व्यवसाय जरी रितसर पावत्या घेऊन होत असला तरी खराब होणारा रस्ता मात्र दुसऱ्यांना कमरमोड होणारा ठरला जातोय त्याचाही विचार होणे आवश्यक नाही का ?
कांही दिवसांपूर्वी जो एक टिपर फसला होता, ज्यामुळे विद्यार्थ्यांना रहदारीसाठी अडथळा ठरला होता, रस्त्याची वेळीच दुरुस्ती व देखभाल झाली असती तर तसा प्रसंगच उद्भवला नसता. टीका व तक्रीरीची कोणती संधी कोणालाही मिळालीच नसती. निमित्ताला कारण म्हणून ज्यांना संधी हवी असते, ती मिळालीही नसती. कदाचित प्रशासकीय स्तरावरही अशी संधी आयतीच चालून येते, त्याचा फटका संबंधितांना बसला पाहिजे, असंही कोणाला वाटता कामा नये. कदाचित या परखड वृत्ताचाही कोणाला राग येऊ शकेल परंतु सुचवलेला सल्ला जर अनुपालनीय ठरवला तर नुकसानदायक मुळीच नाही ठरणार एवढे नक्की.