
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
अँड्रॉइड मोबाईलमुळे शेतकऱ्यांची अडचण
जव्हार:-सातबारा उतारा हा शेतकऱ्यांच्या जमिनीचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज असून तो एक प्रकारे जमिनीचा आरसाच मानला जातो.या सातबारा उताऱ्यावर जमिनीच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात.सध्या गाव पातळीवर प्रशासनाच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ह्या पीक पाहणीचे प्रात्यक्षिके घेतली जात आहेत.जेणेकरून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी सोपे होईल.ई-पीक पाहणी-२ या ॲपच्या माध्यमातून पिकांची माहिती कशाप्रकारे अपलोड करावी हे शेतकऱ्यांना प्रत्येक्ष समजावून सांगितले जात आहे.
ई-पीक पाहणीचे फायदे
सध्या ई-पिक पाहणीला चांगला प्रतिसाद मिळत असून आता पिक विमा प्रक्रिया आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत सुलभ पद्धतीने होणार आहे.तसेच या ई-पीक पाहणीमुळे शेतकरी बांधवांना कर्जाची आवश्यकता पडल्यास त्यांना पीक कर्ज सुद्धा मिळविण्यासाठी ह्या ई-पीक पाहणीमुळे सुलभता येईल.त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेती पिकांचे नुकसान झाले तर यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना योग्य मदत मिळेल.
असे जरी असले तरी जव्हार सारख्या आदिवासी व दुर्गम भागात ही ई-पीक पाहणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाबरोबरच शेतकऱ्यांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ई-पीक पाहणीमध्ये शेतीची माहिती भरण्यासाठी शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणे गरजेचे असल्याने तसेच दरी-खोऱ्यात पिकांची लागवड असल्याने त्या ठिकाणी इंटरनेटच्या समस्येमुळे ग्रामीण भागात ही ई-पिक पाहणी कशी करायची ही मोठी समस्या उद्भवली आहे.