
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : कधी संततधार, कधी मुसळधार तर कधी ढगफुटीसारखी पर्जन्यवृष्टी झाल्याने यावर्षी मराठवाड्यातील नद्या, नाल्या मागील बऱ्याच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भरुन वाहताना द्ष्टीपथास येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची पातळी सुध्दा दिवसेंदिवस अधिकच वाढली जातेय. दूथडी भरुन वाहणाऱ्या नद्या पाण्याचा स्त्रोत वाढीस लावत आहेत त्याचाच परिपाक म्हणून धोक्याची पातळी गाठणारे जायकवाडी धरण सर्वदूर तुडुंब भरलेले दिसते आहे. शिवाय भविष्यातही पाणी वाढू शकेल असे दिसते आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग सुध्दा मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे. किंबहुना त्यासाठीच धरणाचे सर्वच्या सर्व म्हणजेच २७ दरवाजे खोलणे भाग पडले आहे. इतिहासात पहिल्यांदाच एवढे सगळे दरवाजे खोलून पाण्याचा विसर्ग अधिक प्रमाणात सुरु ठेवणे भाग पडले आहे.
ढालेगाव बंधाऱ्याचे उघडले १६ दरवाजे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
ढालेगाव धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जायकवाडी धरणाबरोबरच हे पाणी सुध्दा सोडले गेल्याने गोदावरी नदी आणि तिच्या सर्व
उपनद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. महापूरासारखी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गोदाकाठच्या आणि सर्वच उपनद्यांवरील जी जी गावे, शहरे वसली आहेत, त्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
येलदरी धरणाचे ७ दरवाजे
“”””””””””””””””””””””””””””””””””
हिंगोली जिल्ह्यातील येलदरी. धरणाचे ही सात दरवाजे उघडले असल्याने पूर्णा नदीच्या प्रवाहात कमालीची वाढ झाली आहे. त्या नदीकाठच्या लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात येऊन गावातील नागरिक, जनावरे, अवजड साहित्य व मोटारींची काळजी घेण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत.
एकूणच मराठवाड्यातील जायकवाडीसह सर्व धरणे, गोदावरी या मुख्य नदी बरोबरच उपनद्याही तुडुंब भरुन वाहत आहेत. त्यामुळे अत्यंत भीतीदायक अशी परिस्थिती कधी आणि काय उग्रता दाखवून देईल, यांचा नेम नाही. शासन स्तरावर याप्रकरणी कटाक्ष ठेवल्याचे बोलले जात आहे. त्याचाच परिपाक म्हणून खोलण्यात आलेले जायकवाडीचे सर्वच्या सर्व दरवाजे म्हणजे इतिहास झाल्याचे सांगितले जात आहे.