
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : शिंदे गटाचे रामदास कदम यांनी दापोलीच्या मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख तथा मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पक्ष प्रमुखांच्या अस्तित्वापासून ते शिवसेनेच्या भवितव्याबाबत त्यांनी टोकाची विधाने केली असून आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेला करारा जवाब दिला आहे असा आसुरी आनंद कदम यांना झाला.
मात्र, ज्यामुळे आपले राजकीय अस्तित्व निर्माण झाले त्यांनाच विसरण्याची पद्धत सध्या राजकारणात सुरु झाली असल्याची टीका शिवसेनेचे युवराज दाखले यांनी केली आहे. खऱ्या अर्थाने रामदास कदम यांनी स्वत:च्या आयुष्यातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची नावे जरी वजा केली तर कोणते पद मिळाले असते? याबाबत आत्मपरिक्षण करावे असा सल्ला दाखले यांनी दिला आहे.
ज्या पक्ष नेतृत्वामुळे आपले राजकीय जीवन घडले त्यांच्यावर अशाप्रकारे टीका करणे ही आपली संस्कृती नाही. एकीकडे वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाखाली राजकारण करायचे आणि दुसरीकडे त्यांच्याच मुलाचा असा एकेरी उल्लेख हे अशोभनीय असल्याचेही युवराज दाखले म्हणाले आहेत.
आज जे बोलत आहात ते कुणालबद्दल याचा थोडा विचार होणे गरजेचे आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांची नावे तुमच्या जीवनातून काढली तर एकातरी पदाच्या लायकीचे होतात का ? असा सवालच युवराज दाखले यांनी उपस्थित केला आहे.
स्वत: मागून घेतलेल्या गुहागर मतदारसंघात तुमचा पराभव झाला असताना विधानपरिषदेच्या माध्यमातून रामदास कदम यांचे पुनर्वसन केले होते. राजकीय भवितव्य घडवण्यासाठी शिवसेनेचे असलेल्या योगदानाचा तुम्हाला विसर पडला असल्याचे युवराज दाखले यांनी आठवण करुन दिली.