
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी- दिपक काकरा.
चार संस्थेतून 363 विद्यार्थी उत्तीर्ण
जव्हार:-शाश्वत रोजगाराच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे व भवितव्य उज्वल करण्याचे अविरत कार्य सुरू राहावे यासाठी विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.जव्हार शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे जव्हार,मोखाडा,विक्रमगड व कारेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील उत्तीर्ण झालेल्या 363 गुणवंत विद्यार्थ्यांना पदवीदान प्रमाणपत्र वाटप करून सत्कार करण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त यावर्षी पासून हा पदवीदान समारंभ या पुढे प्रत्येक वर्षी घेण्यात येणार आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था जव्हार येथील प्राचार्य रोहन चुंबळे यांचेकडे मोखाडा,विक्रमगड व कारेगाव येथील संस्थांचा अतिरिक्त पदभार असूनही उत्तम प्रकारे शिक्षण देण्याचे काम सुरू आहे.या चारही संस्थेचे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ शनिवारी जव्हार येथील संस्थेत आयोजित करण्यात आला होता.या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जव्हार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.हेमंत मुकणे,नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मानीनी कांबळे,मुलुंड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक आरिफ मुजावर,जव्हार येथील संस्थेत सेवानिवृत्त झालेले प्रकाश चुंबळे, पत्रकारिता प्रशिक्षण अभ्यासक्रमात विशेष योग्यता श्रेणी प्राप्त केलेले पत्रकार संदीप साळवे आदी.व्यक्तींच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवीदान प्रमाणपत्र वाटप करून सत्कार करण्यात आला.
उपस्थितांपैकी प्रत्येकाने विद्यार्थ्यांचे कौतुक व गुणगान गात भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कामना व्यक्त केल्या.प्राचार्य चुंबळे यांनी विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात रोजगाराच्या संधी बाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले,उपप्राचार्य मुकणे यांनी त्यांचे कटू अनुभव सांगत विद्यार्थ्यांना पुढील जीवनात नियोजन पूरक काम करण्यासाठी प्रोत्साहित केले.
दीक्षांत समारंभ सुरू असताना विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही आले होते.यावेळी संस्थेच्या माध्यमातून पालकांचा देखील विद्यार्थ्यांसोबत सत्कार करण्यात आला.पालकांनी देखील संस्थेने केलेले कौतुक विशेष असल्याचे बोलताना सांगितले.या वेळी उमेश तामोरे यांनी सूत्रसंचालन केले.गट निदेशक एच.एल.मांजे यांनी आभार मानले.