
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“”””””””””””'”””””””””“””””””””””””‘”””””””””
परभणी : जिल्ह्यातील असंख्य नागरिक सांप्रदायिक आहेत. श्री क्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईं प्रति त्या प्रत्येकांची भावना भक्तीमय मार्गाने जुडली गेली आहे. त्या अनुषंगानेच परभणी येथून श्री क्षेत्र पंढरपूर साठी एक विशेष रेल्वे कायमस्वरुपी सोडली जावी अशी भक्तांची मनोमन इच्छा आहे. त्या इच्छेचा आदर करुन मीही एक लोकप्रतिनिधी या नात्याने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. परंतु त्या मागणीचा त्यांनी अद्याप गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. परमेश्वर त्यांना आता तरी सुबुद्धी देवो, हीच माझी मनोमन इच्छा असल्याचे खा.संजय जाधव यांनी सांगितले.
संजय जाधव हे परभणी लोकसभा शिवसेनेचे खासदार आहेत आणि रावसाहेब दानवे हे लगतच्या जालना जिल्ह्यातून भाजपाचे लोकप्रतिनिधीत्व करीत आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार असून त्या मंत्रीमंडळात रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री आहेत. मंत्री झाल्यानंतर केवळ भाजपाचेच राहून किंवा पक्षपातीपणाची भूमिका घेऊन ना. दानवे यांना चालणे योग्य नाही. त्याचा त्यांनी विचार करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने आणि आपण मंत्री असलो तरी जनसेवक आहोत, या भावनेने काम करणे गरजेचे असते. विशेष रेल्वेची सुविधा उपलब्ध झाली तर समस्त प्रवासी भक्त ज्या आनंदी भावनेने पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ शकेल, त्याचे पुण्य जेवढे त्या भक्ताला मिळणार आहे, त्यापेक्षा अधिक पटीने रेल्वे सुरु करणारे राज्यमंत्री म्हणून रावसाहेब दानवे यांनाही मिळणार आहे, याचे त्यांना स्मरण असायला हवे. परभणी आणि परिसरातून पंढरीला जाणारा तो प्रवासी भक्त आपला मतदारच असला पाहिजे, अशी भूमिका न ठेवता व कोणतेही पक्षीय राजकारण न करता त्यांनी प्रलंबित रेल्वेची मागणी कधीच पूर्ण करणे आवश्यक होते परंतु तसे न झाल्यामुळेच खा. जाधव यांनी वरील प्रमाणे दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे.
संजय जाधव हे शिवसेनेचे खासदार असले तरी त्यांनी केलेली रेल्वेसंबंधीची ती मागणी लोकभावनेतून केली आहे. ते सुध्दा विठूरायाचे भक्त आहेत. सांप्रदायिक भावनेत लीन होणारे खा. जाधव हे प्रतिवर्षी दिंडी बरोबर पायीच चालत वारी करीत असतात हे सर्वश्रुत आहे. जशी पांडुरंगांप्रति आस्था आहे, तशीच मतदारांप्रति आदराची भावना बाळगणाऱ्या संजय जाधव यांच्या मागणीचा शिवसेनेचे म्हणून नाही तर जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून तरी आदर करणे व ती मान्य करणे गरजेचे होते. एखाद्या मंत्र्यांकडे लोकप्रतिनिधीने केलेली मागणी राजकारण आडवे न आणता विचारात घेणे आवश्यक होते परंतु तसे झाले नाही, किंबहुना त्यासाठीच “परमेश्वर त्यांना आता तरी सुबुद्धी देवो” असे खा. जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
खा. संजय जाधव यांनी केलेली मागणी रास्त असून त्यासाठी त्यांना उग्र आंदोलन करुन रेल्वे प्रशासनालाही वेठीस धरता आले असते. केवळ रावसाहेब दानवे यांचेच नव्हे तर संपूर्ण केंद्र सरकारचेही लक्ष्य वेधून घेता आले असते. रौद्र रुप धारण करून निर्माण रागापोटी आंदोलनाची दिशा भरकटत जावून त्यात राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करण्यापेक्षा व त्याचा भूर्दंड मायबाप जनतेला देण्यापेक्षा एक सहकारी लोकप्रतिनिधी, लगतच्या जिल्ह्याशी जुडलेल्या भावना अधिक वृद्धिंगत व्हाव्यात या हेतूने आणि लोकशाही मार्गाने केलेली खा. जाधव यांची ही मागणी योग्यच म्हणावी लागेल. खरोखरच आता रावसाहेब दानवे यांनीही अधिक ताणून न धरता व विलंब न लावता मागणी केलेली ही रेल्वे तात्काळ सुरु करण्याचे पूण्य पदरी पाडून घेतल्यास निश्चितच समस्त प्रवासी भक्त केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री म्हणून आशीर्वाद दिल्याशिवाय राहाणार नाहीत एवढे नक्की.