
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर: लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील पाच युवक मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील वलीमा कार्यक्रम आटोपून सोमवार दि. १९ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास गावाकडे परतत होते. यावेळी त्यांची कार मुखेड जवळील दापका राजा पुलावरून खाली वाहत्या नाल्यात पडली. यात मागे बसलेले चार जणही काचा फोडून बाहेर पडले. चालक पाण्यात बेपत्ता झाला आहे.
नागरिकांनी व पोलीस, तहसीलच्या पथकांनी तसेच रेस्क्यू टीमने ही कार पाण्यातून ओढून बाहेर काढली आहे. बेपत्ता चालकाचा शोध सुरू आहे.
अहमदपूर जिल्हा लातूर येथील हाडोळती येथे राहणारे कार क्रमांक (एमएच 14- बीआर- 3021) चालक अझर सत्तार शेख हा आपल्या इतर चार मित्रांसोबत मुखेड तालुक्यातील बार्हाळी येथे वलीनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री ते आपल्या गावाकडे परतत असताना हिप्परगा शिवारात असलेल्या दापकाराजाच्या जवळ असलेल्या पुलावरून वाहत्या पाण्यात कार कोसळली.
कारमधील अन्य चार जण काचा फोडून बाहेर पडल्याने सुखरूप बचावले. मात्र चालक या अपघातात अजूनही बेपत्ता आहे. तहसीलदार काशिनाथ पाटील, पोलीस निरीक्षक विजय गोबाडे यांच्यासह रेस्क्यू टीम त्या ठिकाणी बेपत्ता चालकाचा शोध घेत आहेत. घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली असून मंगळवारी पहाटे ही कार पाण्यातून बाहेर काढली आहे.