
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
आधी चार ते पाच दिवसाला पाणी येणाऱ्या औरंगाबादकरांना पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. कारण एका उंदराने अख्ख्या शहराचा पाणीपुरवठा 11 तासांसाठी बंद पाडला होता. तर आता शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, औरंगाबादकरांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भर पावसात औरंगाबादकरांवर पाणी संकट ओढवले आहे.
सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास जायकवाडी पंपगृहातील पंप क्रमांक 4 च्या फिडरमध्ये अचानक एक उंदीर घुसला. त्याने घातलेल्या गोंधळानंतर शॉर्टसर्किट होऊन ट्रान्सफॉर्मर खराब झालं. याबाबत माहिती मिळताच महानगरपालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतलं. मात्र या संपूर्ण दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 13 तास लागले. त्यामुळे या काळात शहरात थेंब भर सुद्धा पाणी आलं नाही.
या घटनेमुळे जायकवाडी धरणातून येणारी पाणीपुरवठा योजना तब्बल 13 तास बंद होती. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. नागरिकांना एक ते दोन दिवस उशिरा पाणी येणार आहे. आधीच पाच ते सहा दिवसांनी येणारे पाणी आणखी दोन दिवसांनी वाढल्याने, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. एकीकडे जायकवाडी धरण 100 टक्के भरलंय, मात्र तरीही औरंगाबादकरांना पिण्याचे पाणी काही मात्र वेळेवर मिळत नाहीये.