
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
=======================
मुंबई : राज्यात 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू, अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझी, माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांच्या या दाव्याला तेव्हाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दुजोरा दिला आहे, पण हे करताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केलं आहे. ‘2014 ला शिवसेनेशी चर्चा झाली होती, अशोक चव्हाण खोटं बोलत नाहीत.
जर 2014 साली राष्ट्रवादीने आधीच बाहेरून पाठिंबा जाहीर केला नसता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं,’ असं माणिकराव ठाकरे म्हणाले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी भूमिका घेतल्यामुळे तो विषय पुढे जाऊ शकला नाही. शिवसेनेचे नेते आमच्याकडे त्यावेळी प्रस्ताव घेऊन आले होते, पण राष्ट्रवादीशिवाय सरकार बनणं शक्य नव्हतं, त्यामुळे तिथेच सगळं थांबलं. भाजपा सत्तेबाहेर काढण्यासाठी हा सगळा विषय सुरू होता.
मी त्यावेळी प्रदेशाध्यक्ष असल्याने मला या प्रस्तावाची पूर्ण कल्पना होती. आताच्या मुख्यमंत्र्यांना भाजपच्या जाळ्यात आता ओढण्यात आलं आहे,’ असं विधान माणिकराव ठाकरे यांनी केलं आहे. 2014 साली भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे चारही पक्ष वेगळे लढले होते. निवडणुकीनंतर भाजप हा 122 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता.
निवडणुकीचे निकाल लागत असतानाच महाराष्ट्रात स्थिर सरकार असावं म्हणून भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला होता. यानंतर भाजपने आवाजी मतदानाने विधानसभेत बहुमत सिद्ध केलं होतं. निवडणुकीत दुसरा मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतपद मिळालं. एकनाथ शिंदे यांचीच विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली, पण काही महिन्यांमध्येच भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेसोबत युती केली, ज्यामुळे शिवसेनेला मंत्रिपदं मिळाली.