
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
मार्ग तपासणी अधिकाऱ्यांकडून दुप्पट दंड वसुली
जव्हार:- महाराष्ट्राची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीला ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारा दुवा म्हणूनही ओळखले जाते.ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासाकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस.टी वरच अवलंबून राहावे लागत आहे.कमी भाडे आकारणी आणि सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने एसटीलाच प्रवाशांची पहिली पसंती आहे.असे जरी असले तरी अनेक ठिकाणी महामंडळाच्या बसेसमध्ये विनामूल्य तिकीट प्रवासी प्रवास करताना आढळले असून अशा फुकट्या प्रवाशांकडून एसटीच्या मार्ग तपासणी अधिकाऱ्यांकडून प्रवास भाड्याच्या दुप्पट दंड वसुली करण्यात येत आहे.गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत अनेक विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मार्ग तपासणी अधिकाऱ्यांनी हजारो रुपयांचा दंडही वसूल करत फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
कोरोना सारख्या जागतिक महामारी आणि मागील काही महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे.त्यातच असे फुकटे प्रवासी भर घालत असून अनेक ठिकाणी विनामूल्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास करणे महागात पडले आहे.गेल्या काही दिवसांमध्ये मार्ग तपासणी अधिकारी हे विनामूल्य तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर ठेवून आहेत.पालघर विभागात जून ते जुलै या दोन महिन्यांच्या दरम्यान सर्वाधिक विनामूल्य प्रवासी आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे.कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर महामंडळाची एसटी हळूहळू पूर्व पदावर येत असतानाच अशा फुकट्या प्रवाशांमुळे एसटीला नाहक नुकसान सहन करावे लागत आहे.त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपली तपासणी यंत्रणा अधिक कडक करत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.