
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
श्रीक्षेत्र मिरपूर लोहारे, ता. संगमनेर, जि. अहमदनगर शिक्षणमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची शिक्षण पंढरी लोणी तथा प्रवरानगर याबद्दल सर्व भारतीय परिचित आहेतच. तसेच श्रीक्षेत्र शिर्डी येथील संत श्री साईबाबा यांची अवघ्या जगाला ओळख आहे. अशाच या संतांच्या महाराष्ट्र भूमीत प्रवरानगर लोणीपासून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर मिरपूर लोहारे हे गांवसुद्धा एका योगीपुरुषाच्या देवस्थानामुळे प्रसिद्ध झाले आहे. या देवस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीसमर्थ आवजीनाथ महाराज यांचे देवस्थान तसेच समस्त वंजारी समाजाचे श्रद्धास्थान लोणी गावाहून तळेगांव, नांदूरशिंगोटे मार्गाने नाशिकला जाताना अगदी मुख्य रस्त्यावर लोहारे गावी श्रीसमर्थ आवजीनाथांचे भव्य मंदीर लागते.
श्रीसमर्थ आवजीनाथ मंदीर ट्रस्ट मिरपूर लोहारे या मंदीराचा जिर्णोद्धार स्व. रामभाऊ गणपत करपे रा.नाशिक यांचे पुढाकाराने समस्त गावकऱ्यांच्या व वंजारी समाजबांधवांच्या सहकार्यातून करण्यात आला. स्व. वाय. पी. वराडे, नाशिक वास्तुशिल्पकार तसेच श्री केशवराव मुर्तडक रा.संगमनेर या सह अनेक समाज बांधवांच्या सहयोगातुन योगदानातुन त्यांच्या कल्पनाशक्तीमुळे व प्रयत्नामुळे हे भव्य देवालय साकारण्यात आलेले आहेत. दि. २५ जानेवारी १९९१ शुक्रवार रोजी या देवस्थानाचा कलशारोहण कार्यक्रम अनेक मान्यवर भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तेंव्हापासून श्रीसमर्थ आवजीनाथांच्या यात्रेस भाविकांची गर्दी अधिकच वाढू लागली व यात्रेस भव्य स्वरुप प्राप्त झाले.
विजयादशमीस प्रभु श्रीरामचंद्र १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्या नगरीस परतले, तो शुभ
दिन हिंदू धर्मात विजयादशमी म्हणजे दसरा या सणास फार महत्व आहे. म्हणूनच दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा ” असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तापैकी एक अमृत मुहूर्त म्हणजे दसरा, या दिवशी सर्वांनी सिमोल्लंघन करायचे, सोने लुटायचे, या सुवर्ण दिनाचे महत्व वर्णावे तितके कमीच. तसेच एक आगळे महत्व वंजारी समाजबांधवांसाठी आहे, ते म्हणजे श्रीसमर्थ आवजीनाथ बाबा यांचा यात्रा महोत्सव.दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी श्रीसमर्थ आवजीनाथ बाबांच्या यात्रेस संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक श्रद्धेने मिळेल त्या वाहनाने वा पायी वारी करीत यात्रेस जमतात. जसजशी रात्र वाढत जाते, तसतसे मंदीराचा परिसर भक्तांनी फुलून जातो. या यात्रेच्या निमित्ताने अनेकांचे आपल्या नातेवाईक आप्तजणांचे भेटीगाठी होतात. नविन ओळखी होतात. या निमित्ताने काही विवाहबंधही जुळतात.
या यात्रेच्या निमित्ताने वंजारी समाजबांधवांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येतो. धार्मिक किर्तने, प्रवचने, प्रबोधने, व्याख्याने समाजातील अडीअडचणी, समाजविकास इत्यादी विषयावर चर्चा घडवून आणण्यात येते. समाजातील विविध मंडळांकडून भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर अन्नदान करण्यात येते.
मंदीराच्या प्रांगणात तसेच सभागृह आवारात भाविकांची प्रचंड गर्दी असते. श्री. आवजीनाथ बाबांचा ध्वज गावभर मिरवून मंदीर प्रांगणात आणण्यात येतो. बाबांची आरती महापुजेनंतर प्रांगणात निखाऱ्यावरुन अनवाणी चालत जाऊन नवस फेडण्याचा कार्यक्रम सुरु होतो. फुलोरावरुन चालणे असे म्हणतात. यास भाविकांनी श्रद्धेपोटी नवस केलेला असतो. भक्तगण विशेषतः महिला हाती पूजेचे ताट घेऊन रांगेत निखाऱ्यावरुन चालत जाऊन नवस फेडतात. ही प्रथा फार जुनी असून अजूनही लोकांची यावर नितांत श्रद्धा व पूर्ण होणाऱ्या मनोकामना यामुळे भाविकांच्या संख्येत अधिकच वाढ होत आहे.
काही भाविक बाबांच्या मंदीरात सत्यनारायण पूजेचेही आयोजन करतात. काही बाबांचा अभिषेक करतात. संबंध रात्रभर यात्रेत भाविकांची गर्दी वाढतच असते. काही भाविक रात्री दर्शन घेऊन परततात. मुक्कामी असणारे भाविक सकाळी श्री. आवजीनाथ बाबांचे दर्शन घेऊन भक्तीभावाने निरोप घेतात.
अशा या मिरपूर लोहारे गावाची श्री. आवजीनाथ बाबांची यात्रा म्हणजे समस्त वंजारी भाविकांसाठी एक पर्वणीच असते. आपले आराध्य कुलदैवत मानणाऱ्या श्री. आवजीनाथ बाबांच्या यात्रेची भाविक आतुरतेने वाट पाहात असतात.
*।। श्री आवजीनाथ बाबांचे चरित्र ।।*
” जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ” समाजात जेव्हा जेव्हा चांगल्या गुणांचा -हास होतो, व वाईट प्रवृत्ती बळावतात, अन्याय अत्याचार वाढतात, तेंव्हा तेंव्हा समाजाच्या उत्कषांसाठी, समाज कल्याणासाठी महापुरुष अवतार धारण करतात. श्री. संत ज्ञानेश्वर, श्री. संत तुकाराम महाराज, समर्थ श्री. रामदास, श्री. साईबाबा, श्री. संत गजानन महाराज, अशा अनेक संतांचे समाजावर अनंत उपकार आहेत.
अशाच एका महापुरुषाचा जन्म सुमारे ३५० वर्षापूर्वी वीरगांव, ता. अकोले, जि. अहमदनगर येथील गोरे घराण्यातील गरीब रावजीनशाखेतील वंजारी शेतकरी कुटुंबात झाला. बालपणीच माता-पित्याचे छत्र हरवलेल्या आवजीनाथांना त्यांच्या रणमळे मामांनी मिरपूर लोहारे येथे आणून त्यांचे पालनपोषण केले. आवजीनाथ बालपणी सवंगड्यांसह गुरे राखण्याचे काम करीत असत.
सात्विकभावाचा आवजीनाथ सतत ईश्वर स्मरणी रममाण होत. आपल्या सवंगड्यांसह गुरे राखताना आवजीनाथ ध्यानस्थ बसणे, सवंगड्यांना उपदेश करणे, ऋषिमुनींसारखा अभिनय करणे, अशा लिला करत. नंतर सर्व सवंगड्यांसह सोबतची शिदोरी सोडून सहभोजन करीत असत.
असेच एकदा मिरपूर जवळील कानोबाच्या डोंगरावर आवजीनाथ सवंगड्यांसह गुरे राखीत असतांना खेळ खेळत असता, नवनाथांची भ्रमणयात्रा येथून जात होती. नाथांनी दुरुनच या मुलांचा खेळ पाहिला. नवनाथांपकी श्री कानिफनाथांच्या दिव्य नजरेने आवजीनाथास हेरले व साधुवेशात आवजीनाथांजवळ गेले व भोजनाची ईच्छा व्यक्त केली. आवजीनाथानेही अतिथी कानिफनाथांना आपल्या शिळ्या भाकरीच्या शिदोरीचे भोजनास आमंत्रित केले. एव्हाना आवजीनाथांचे सवंगडी मित्र कानिफनाथांना पाहून दूर पळून गेले. कानिफनाथांनी भक्त आवजीनाथांसोबत शिदोरी खाऊन7 तृप्त होऊन प्रसन्नतेने आशिर्वाद दिला. आवजीनाथांचे मस्तकी कानिफनाथांचा वरदहस्त पडताच आवजीनाथ समाधिस्त झाले.
रात्र झाली, सर्व गुरे परतली, पण आवजीनाथ परतले नाहीत, म्हणून आवजीनाथांचे मामा मामीशोधार्थ निघाले. शोधात फिरत असतांना कानोबाच्या डोंगरावर समाधि अवस्थेतील आवजीनाथांना मामांनी उचलले. स्पर्श होताच आवजीनाथ जागृत झाले. त्यांचे चेहन्यावर असामान्य तेज झळकत होते. त्या तेजाने मामा-मामीचे डोळे दिपले. आवजीनाथांनी त्यांनाब्रम्हचैतन्य श्री कानिफनाथांच्या दर्शनाचे व दिक्षाप्राप्तीचे तसेच कानिफनाथांसोबत केलेल्या भोजनाचे प्रसंग कथन केले.
आवजीनाथांनी माझे शरीर तीन दिवस घरी अंधाऱ्या खोलीत मीठ व कडूलिंबाच्या पाल्यात ठेवावे व या ३ दिवसांच्या कालावधीत माझ्या साधनेत कोणीही बाधा आणू नये, या साधनेच्या कार्यसिद्धीनंतर मी दिव्यशक्तीने या पंचक्रोषीतील गावांचे रुपांतर सुवर्णनगरीत करील व हे माझे गुरु ब्रम्हचैतन्य श्री.कानिफनाथांच्या आशिर्वादाने सिद्ध होईल, असे मामा-मामींना सांगितले.
परंतु कोणतीही गोष्ट स्त्रियांचे मनात राहात नाही. आवजीनाथांची मामीही यास अपवाद नव्हती. घरात आवजीनाथांचे कलेवर पडून आहे. मामीचे कपाळी कुंकू नाही. मामीचा भेदरलेला चेहरा पाहून शेजारच्या स्त्रिया अधिकच चौकशी करु लागल्या. मामीने न राहवून सर्व घटना सांगितली. हा हा म्हणता ही बाब सर्व गावात पोहोचली. तीन दिवस मृत शरीर घरात लपविले, यामुळे गावकरी संतप्त झाले व मामा मामीस आवजीनाथांचा अंत्यविधी करण्यास भाग पाडले.
मामांनी आवजीनाथांना अंत्ययात्रेस नेण्यासाठी शरीरास स्पर्श करताच श्री आवजीनाथाचे मृत शरीर पुनः सजीव झाले. या घटनेने गावकरी घाबरले. पुढे ७ दिवस आवजीनाथ जिवंत राहिले व त्यांनी गावकऱ्यांना सांगितले की, ब्रम्हचैतण्य कानिफनाथांच्या आशीर्वाद व दिक्षा प्राप्तीनंतर त्यांना दिव्य ध्येय प्राप्ती झाली असल्याने सदेह समाधी घेण्याची वेळ आलेली आहे. सर्व गावकऱ्यांना आपल्या सामर्थ्याचे दिव्य शक्तीचे दर्शन देऊन आवजीनाथ सदेह समाधीस्त झाले. तो सुदिन होता २ घटस्थापनेचा व ज्या दिवशी त्यांचा आत्मा परमात्म्याशी एकरुप झाला, तो सुदिन होता विजयादशमीचा.
ब्रम्हचैतन्य श्री. कानिफनाथांच्या अनुग्रहाने आवजीचा श्री समर्थ आवजीनाथ बाबा झाले. *जय आवजीनाथ सेवा संघ या संस्थेचे कार्य* जय आवजीनाथ सेवा संघाचे श्री संत आवजीनाथ बाबा हे वंजारी समाजातील आद्य संत होउन गेलेले आहे…श्री बाबांचे भव्य देवालय श्री क्षेत्र मिरपुर लोहारे येथे असुन श्री आवजीनाथ बाबांनी बालवयातच या ठिकाणी संजीवन समाधी घेतलेली आहे.. अतिशय जुना काळ असल्यामुळे काळाच्या ओघात समाजाचे या दिव्य संताकडे , देवस्थानाकडे दुर्लक्ष होत राहीले ..अलिकडच्या पंचवीस वर्षांपासुन देवळाचा जिर्णोद्धार झाल्यापासुन येथील दसरा मेळाव्या महत्व प्राप्त झाले असुन महाराष्ट्रातील सुमारे दोन लाख भाविक यात्रेला हजेरी लावतात… जय आवजीनाथ सेवा संघ हि सामाजिक संस्था आद्यसंत श्री आवजीनाथ बाबाचा प्रचार व प्रसार हा पुर्ण भारतात व्हावा यासाठी झटत आहे..या देवस्थानाकडे कोणत्याही राजकीय नेत्यांचे लक्ष जात नाही ..या संतभुमीला केवळ राजाश्रय नसल्यामुळे हे देवस्थान व या देवस्थानाला श्री संत आवजीनाथाला मानणारा वंजारी समाज उपेक्षित राहीला व या देवस्थानाचा विकास म्हणावा तसा होत नाही..समाज उगवत्या सुर्याला नमस्कार करत असतो एकीकडे वंजारी समाज श्री क्षेत्रभगवानगड,सावरगाव , नारायणगड या देवस्थानी अलोट गर्दी करतो तर तर वंजारी समाजातील या आद्यसंत श्री आवजीनाथ बाबा देवस्थानाकडे त्याच्या विकासाकडे कुणी नेत्याचे लक्ष जात नाही.. हि सामाजिक शोकांतीका आहे..महाराष्ट्रातील जवळपास ऐंशी टक्के पुढारलेल्या वंजारी समाजाला आजही श्री संत आवजीनाथ महाराज या बाबत काहीच माहीती नाहीये … वंजारी समाजातील महान दिव्य आद्य संताचा परिचय समस्त वंजारी समाजाला व्हावा.. या आद्यसंतांचा सर्वांना अभिमान वाटावा यासाठी श्री आवजीनाथ प्रत्येक वंजारी समाजाच्या घरोघरी, मनोमनी , ह्रदयात पोहचावा देवघरात पोहचावा या साठी जय आवजीनाथ सेवा संघ ध्यास घेउन कार्य करीत आहे.. व याच उद्देश व वंजारी समाजाच्या उत्कर्ष व निस्वार्थ समाजसेवेसाठीच जय आवजीनाथ सेवासंघाचे कार्य निरंतर चालु आहे … व कायम चालुच राहणार . . जय आवजीनाथ !
लेखन – राजेंद्र करपे , संस्थापक अध्यक्ष , जयआवजीनाथ सेवा संघ महाराष्ट्र