
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल बीकेसी मैदानावर दसरा निमित्ताने जाहीर सभा झाली. त्यांची ही सभा विविध कारणांमुळे गाजली. यातच त्यांनी संपुर्ण भाषण कागदावरून वाचून केल्याने त्यांच्यावर आता विरोधी पक्षांकडून टिका करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी भाषण करण्यासाठी थोडे पैसे खर्च करून टेलिप्रॉम्प्टर तरी घेतला असता. असा खोचक टोला हाणला.
बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू असताना लोक सभेतून बाहेर जाताना दिसले. याचे व्हिडीओ विरोधी पक्षातील नेत्यांनी सोशल मीडियावर अपलोड करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. कागदाकडे नव्हे तर जमलेल्या जनसमुदायाकडे बघून बोलता आलं पाहिजे. ते काम आज उद्धव ठाकरे यांनी करून दाखवलं. टेलिप्रॉम्पटर इतका महाग आहे का? 50 खोक्यात पण घेता नाही आला. असा खोचक टोला रविकांत वरपे यांनी मुख्यमंत्र्यांवर लगावला आहे.
भाषण देताना सतत खाली मान घालून कागदावर लिहिलेले वाचण्याचे कष्ट झाले नसते. जर टेलिप्रॉम्पटर घेतला असता तर थोडी तरी इज्जत वाचली असती. एवढा पैसा खर्च करून जनतेत उत्साह नाही. घोषणा नाही. जयजयकार नाही. टाळ्या नाहीत. स्क्रिप्ट पण नीट वाचता येईना. नेतृत्व भाड्याने भेटत नाही. असं म्हणत रविकांत वरपे यांनी शिवसेनेवर दावा ठोकणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर आगपाखड केली.
दरम्यान, आज एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद आहे. त्या जोरावर ते बऱ्यापैकी गर्दी जमवू शकले असते. पण आज उद्धव ठाकरे यांच्याकडे पद नाही. सत्तादेखील नाही. पक्षही फोडलाय. तरीसुद्धा इतक्या मोठ्या संख्येने सामान्य शिवसैनिक सभेला उपस्थित राहुन उद्धव ठाकरे यांना भाषण करताना प्रतिसाद दिला. जे जमत नाही ते धाडस माणसाने करू नये. असं म्हणत त्यांनी शिंदेंना डिवचलं.