
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
प्रत्येकाच्या शालेय जीवनात काही तरी वेगळं वेगळं ,काहीतरी नवनविन घडत असतातं,काही घडलेल्या असत्यात.या घडणाऱ्या घटना काही वेळा बळ देणाऱ्या असतात.काही उर्मी देणाऱ्या असतात.तर काही नाउमेदही करणाऱ्या असतात.काही घटना विस्मृतीत जातात.काही ताज्या तवाना होऊन ताज्या तवाना राहून नेहमीच मनाला आनंदी ठेवतात.मी तर आश्रम शाळेत होतो.जी शाळा माळावर वसलेली आहे.त्या काळी तेथे पिण्यासाठी, अंघोळीसाठी,कपडे धुण्यासाठी पाणी नव्हतं. तीन चार किमी पायी पायी जाऊन अंघोळ करावी लागे.दिवा बतीची सोय नव्हती. विजेचे दिवे मुखेड मध्ये दिसायचे. काळ्याकुट्ट अंधारात ते अंधार चिरत आमच्याकडे येण्याचं भास व्हायचं.आठवड्यातून फक्त एकदाच रविवारच्या दिवशी कपडे धूत असू.कपडे धुण्यासाठी आमचे आनंदराव येडे गुरुजी त्याकाळी चांदणी बारचे छोटे छोटे तुकडे कापून प्रत्येक विद्यार्थ्याला देत असत.
त्याकाळी तुम्ही काहीही म्हणा;पण गुरुजी लोक झपाटलेले होते.ते कधीच त्यांच्या कार्याकडे दुलर्क्ष केले नाही.रात्रंदिवस ते शाळेतील मुलांसाठी झटत. त्यांना काळ वेळेचं बंधन नव्हतंच मुळी.गुरु शिष्याच नातं हे गुरु शिष्याचच होतं. तेथे भेदभाव नव्हतं.जातीयता नव्हती.जातीयता कोणी बाळगल्याच आम्ही पाहिलो नाही. आमच्या शाळेत सर्वच जाती जमातीचे गुरुजी होते पण त्याच्यात भेदभाव कधीच जानवलं नाही.आमची सकाळची प्रार्थनाच होती “खरा तो एकच धर्म हा जगाला प्रेम अर्पावे” तर संध्याकाळी जेवनापूर्वीची प्रार्थना होती”पसायदान”
त्याकाळी आमच्या आश्रम शाळेत खरं भारत नांदत होतं. ते भारत होतं थोर महान व्यक्तीचा स्वप्नातील.ते भारत होतं संत तुकाराम महाराजाच,ते भारत होतं संत ज्ञानेश्वर,संत नामदेव महाराजचं.ते भारत होतं छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतीबा फुले,छत्रपती शाहू महाराज व घटनाकार बाबासाहेबांचं. तेथे उच निचता नव्हती.तेथे गरिबी नव्हती.तेथे श्रीमंती नव्हती. सगळे कसे आम्ही एकत्र खेळत असू.एकत्र जेवत असू व एकत्रच एका खोलीत किमान वीस मुलं झोपत असू. तेथे राज्य होतं तुकडोजी महाराजांचं ” येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरीन बोजा या झोपडीत माझ्या”
गुरुजीना मुल भित होती.गुरुजी मारायचे.शिक्षा ही करायचे.त्या काळचे गुरुजी एकाचवेळी ते आई बापचे कर्तव्य पार पाडत पाडत शिकवायचे.ते आईचं प्रेम देवून मुलांना शिकण्यासाठी प्रेरीत करावयाचे. त्याकाळी वडीलासारखी शिक्षा देणारे व आईसारखं काळीज असलेली माणसंच त्याकाळी शिक्षक होत होते असं मला वाटते. त्या काळचे गुरुजी जवळ फारसे पुस्तकी ज्ञान नसलेही.त्यांनी शिक्षणाची लांबी (पदव्या) रुंदी वाढविले नसतीलही ;पण त्यांच्या ज्ञानाची खोली अफाट होती अचाट होती.हे मात्र खरं आहे.
आश्रम शाळेत विविध अभ्यास पूरक कार्यक्रम त्या काळी घ्यायचे. कार्यानुभव म्हणून माझ्या शाळेत आम्हाला बिस्कीट कसे तयार करावे ,चरख्यावर सुतकताई कशी करावी याचं माहिती ते देत. आश्रमशाळेत शेकडो लाकडी चरखे होते.ते पाहून आम्हाला गांधी बाबाचं चित्र ध्यानात यायचं.या बरोबरचं शेतातील खुरपणे व निंदने या विषयीचे प्रात्यक्षिक ही एक दोन वेळेस प्रत्यक्ष शेतात नेऊन वर्तळा,वर्तळा तांडा व सांगविच्या शेतात आमच्याकडून शेतात निंदून घेतले होते.आम्ही सर्वजण गुरुजीनी सांगितलेलं प्रत्येक काम आज्ञाधारकपणे पार पाडत असू.
१९७४ ची गोष्ट आहे त्यावेळी बहुधा मी आठव्या वर्गात शिकत होतो.त्यावेळी आम्हाला एक नविन अभ्यासक्रम आलं होतंं.ते होत कृषी शास्त्रचं अभ्यास.त्यात शेतातील पिकाविषयी , खताविषयी माहिती होती. हा विषय शिकविण्यासाठी आम्हाला एक नविनच गुरुजी आले.दिसायला छान होते. नाक सरळ लांब होती. डोक्या्यावर काळेशार केस होते. डोळे टपोरे व बोलके होते.आटोपशीर भांग पाडलेली.दिसायला रंगाने काळे होते;पण दिसायला सुंदर होते. शरिराने काटक होते. त्यांचा पेहराव आमच्या आगोदरच्या गुरुजी सारखं आजीबात नव्हतचं.काय सांगावं तुम्हाला आता कळतय मला तेव्हा त्यांच्या अंगावर भारीचे म्हणजेच निश्चितच रेमंडचे कपडे होते किंवा असावेे.पायात बुट होते बाटाचे.येवढे ते टापटीप होते.बाकी गुरुजीची तुलना कपड्या बाबत त्यांच्यासोबत होत नव्हती.त्या सर्वात ते वेगळे उठून दिसायचे. ते नुकतेच शिक्षण पूर्ण करून आले होते.त्यांनी बोर्डावर बी एस्सी अॅग्री असं ओळख करून देताना लिहीलं होते.
गुरुजीचं नाव बहुधा दिगांबर मारोतीराव काकडे असं होतं. ते फार कमी काळ आम्हाला शिकवायला होते. पुढेचालून ते कोणत्यातरी साखर कारखाण्यात शेतकी अधिकारी म्हणुन लागले असे आमचे इतर गुरुजी सांगावयाचे .त्यामुळे नावा बदल खात्री मी खात्री देणार नाही देत.गाव होतं बहुधा कौठा.आमच्या पेक्षा वयाने ते आठ दहा वर्षांनी मोठे असतील;पण ते आमच्यात मिळून मिसळून रहात. आम्हाला छान पैकी शेतीची माहिती देत.पिकांची माहिती देत असत.ते कधी आम्हाला शिक्षेची भिती दाखवत नसत.
आमच्या वर्गातील सर्व विद्यार्थी काकडे सरांबरोबर कबड्डी खेळत असू. त्यांचा बरोबर क्रिकेट खेळत असू.ते आमच्या बरोबर मोकळेपणाने बोलत मोकळेपणाने वागत. एकदा काकडे सर शेतकरी व गावातील इतर समाजाविषयी माहिती देत होते.ते माहिती देत असताना धनगर समाजाविषयी माहिती सांगत होते.माहिती देता देता ते म्हणाले मीही धनगर आहे. धनगर समाज मेंढ्या पाळतो हे आम्ही ऐकून होतो;पण त्यापेक्षा खेडेगावातील लोकांचं बोलणं मी नेहमी ऐकायचो ” काय रे तूझी झोप धनगरासारखी आहे का दिवसाच्या बारापर्यंत तूझी झोप जात नाही/ गेलेली नाही.”
लोक असं का म्हणतात हा प्रश्न मला नेहमीच पडायाचा. धनगर आळशी असावा म्हणून लोक नेहमी ज्यास्त वेळ झोपणाऱ्याला धनगर म्हणतात असं माझं गोड गैरसमज होता.आम्हाला काकडे गुरुजी म्हणाले की ते धनगर आहेत तेव्हा मला वाटलं गुरुजीलाच जर मनातील शंका विचारलो तर ते सांगितल का ? असं काही विचारलं तर गुरुजी रागावतील,मारमार मारतील असं विचार करत मी थोडावेळ गप्प बसून राहीलो ;पण माझं मन मला स्वस्थ बसू देत नव्हतं माझं मन मला म्हणत होतं “विचार विचार मारून मारून किती मारतील छड्या.”
मी मनाचा हिय्या करून गुरुजीला विचारलो,” गुरुजी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का?” गुरुजी तोंडावर स्मित हास्य पसरवत आनंदाने म्हणाले,”विचार विचार मन मोकळेपणानं विचार.” गुरुजीचं हे प्रेमळ बोलणं ऐकून मी हिंमत धरून विचारलो ,”गुरुजी धनगराची झोप दिवसाच्या बारापर्यंत का जात नाही?” माझं प्रश्न ऐकून अखा वर्ग हास्यात बुडाला. कोणी फिदीफिदी हसत होते. कोणी तोंडासमोर हान धरून हसत होते.कोणी खाली मान घालून हसत होते.तर एक दोन मुलं माझ्याकडे गंभीर चेहरा करून पहात खूणेनं सांगत होते आता तूझं काही खरं नाही.”
मी प्रश्न विचारलो;पण माझे हातपाय ही थरथरत होते.मी गुरुजींच्या चेहर्याकडे न पहाता माझ्या पायाच्या अंगठ्याकडे पहात थांबलो. गुरुजी आता मला काय शिक्षा देणार याची वाट पहात मी थांबलो तर वर्गातील सर्व मुल सूतकी चेहरा घेऊन गप्प बसले. मला वाटत होतं हा प्रश्न विचारून माझ्या हातून पाप घडलंय. मी मोठी चूक केलीय. काकडे गुरुजी माझ्या प्रश्नावर थोडावेळ विचार केले. मग मला जवळ बोलविले. तेव्हा त्याच्या चेहर्यावर रागाच्या ऐवजी हसू झळकलं होतं.माझी पाठ थोपटली व म्हणाले “,जा जाग्यावर बस जा” माझ्या जीवात जीव आलं.मी वर्गावरून एक नजर फिरवली.सगळे आनंदी दिसले.मी जाग्यावर येवून बसलो.
आता काकडे गुरुजी म्हणाले ,”मुलांनो ऐका धनगरांची झोप दिवसाच्या बारापर्यंत का जात नाही.” तुम्हाला माहित आहे का?धनगराचं व्यवसाय काय आहे?”आम्ही बहुसंख्य मुलं एकाच सुरात म्हणालो,मेढया चारवणे”गुरुजी म्हणाले ,”छान.आपण त्यांना मेंढपाळ म्हणतो.मी ही मेंढपाळ आहे.धनगर आहे. धनगर नेहमीच दिवसभर मेंढ्या चारवतो. दिवसभर जंगलात भटकत राहतो. संध्याकाळी तो मेंढरं घेऊन घरी येतो किंवा कोणाच्या तरी शेतात मेंढरं तो बांधतो. रात्रीचं जेवन घेतो. त्यालाही झोप येते;पण त्याला झोप घेता येत नाही अशातला भाग नाही;पण तो रात्रभर जागाचं राहतो. याचं एक कारण म्हणजे भटके कुत्रे किंवा रानटी लांडगे,कोल्हे रात्रीला शिकारीसाठी भटकतात व ती मेंढ्यांची शिकार करतात त्याच्या पासून सुरक्षित राहण्यासाठी धनगर रात्रभर जागा राहतो. आम्हाला वाटलं फक्त यासाठीच हे झोपत नाहीत.पण या उत्तराने माझे समाधान झाले नाही.
काकडे गुरुजी पुढे म्हणाले ,”मुलांनो नीट ध्यान देऊन ऐका.धनगर लोक कुत्रे , लांडगे व कोल्हे यांना भित नाहीत खरी भिती असते यांना चोरांची.आता चोर म्हंटले की प्रत्येक समाजात असतात पण फासेपारधी,लमाणी ,उचल्या यासारखे लोक हे रात्रीला चोरी करण्यासाठी येतात.ते चोरी त्यांच्या पोटासाठी करतात; पण नुकसान आमचं होतय ना.या चोरांपासून आम्हाला आमच्या मेंढ्या सुरक्षित ठेवायचे असतात.रात्रीला बारानंतर चोरांचा खरा दिवस सुरु हातो तो पहाटे चार पर्यंत चालू राहातो म्हणून आम्ही धनगर रात्रीला झोप घेत नाही. चोरीच्या भितीने आम्ही पहाटे चार पाच पर्यंत झोपत नाही. पूर्वेला लाली फुटायला लागाली की आम्ही घोंगडी घालून पांघरून झोपी जातो ते थेट उठायला दिवसाचे बारा वाजतात.याचा अर्थ धनगर समाज आळशी आहे असा होत नाही.आता कळालं का धनगराची झोप दिवसाच्या बारापर्यंत का जात नाही ते?
गुरुजीनी जे सांगितलं ते आम्ही मन लावून ऐकलो. ते आजही हृदयाच्या कप्प्यात जसंच्या तसं जमा करून साठवून ठेवलोय. मला जेव्हा जेव्हा मेंढरं घेवून धनगर भेटतात किंवा या समाजाचे माझे मित्र भेटतात तेव्हा मला माझे काकडे गुरुजी आठवतातच .
©️राठोड मोतीराम रुपसिंग
विष्णुपूरी,नांदेड -६
९९२२६५२४०७ .