
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
‘””””””””””””””’
परभणी : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शिवसेनेचा बुधवारी म्हणजेच
आज रोजी रास्ता रोको आयोजित केला गेला आहे. या आंदोलनाचं नेतृत्व परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव हे स्वतः करणार आहेत.
नुकताच झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यातला शेतकरी वर्ग पूरता मेटाकुटीला आला आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान पिकांची पहाणी करुन पंचनामे पूर्णत्वास न्यावेत त्याशिवाय संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ मिळू शकेल यासाठी युध्दपातळीवर यंत्रणा कामाला लावणे गरजेचे आहे ज्यामुळे त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल अन्यथा जिल्हा प्रशासनास सळो की पळो करून सोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्वाणीचा इशारा खा.संजय जाधव यांनी दिला आहे. यावरून खा. जाधव यांच्या आंदोलनाला आक्रमकतेची धार असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, पालम, पाथरी, सेलू, जिंतूर, मानवत आणि गंगाखेड या सर्व तालुका स्तरावर एकाच वेळी या आंदोलनाची सुरुवात केली जाणार असून या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः खा. संजय जाधव हे प्रत्यक्ष उपस्थित राहून करणार आहेत. अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून शेतकरी शिवसैनिकांनी हे आंदोलन यशस्वी करुन दाखवायचे आहे. जिल्हा प्रशासनाने वेळीच या आंदोलनाची दखल घेऊन शेतकरी मदतीच्या कार्याला गती न दिल्यास सदरचे आंदोलन अधिक प्रमाणात तीव्र केले जाईल. निर्माण परिस्थितीला शासन व जिल्हा प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील असे खडे बोलही खा. जाधव यांनी सुनावले आहेत.