
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
नांदेड जिल्ह्यातील वझरगा गावचे भूमिपुत्र ज्ञानेश्वर बालाजीराव कोकणे हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून गेली चौदा वर्षे आदिवासी व दुर्गम भागात कर्तव्य बजावत आहेत. आदिवासी भागातील गरजू लोकांना वेगवेगळ्या सामाजिक संस्थेतर्फे किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले असून हजारो विद्यार्थ्यांना अमास सेवा ग्रुप मुंबई या सेवाभावी संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी व त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आदिवासी व दुर्गम भागातील लोकांच्या शैक्षणिक,आरोग्याच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करतात. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शाळेचा भौतिक विकास करण्यावर भर दिला असून त्यामध्ये विळवंडी शाळेस अपुऱ्या वर्गखोल्या असल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या त्यासाठी, विद्यार्थ्याना मध्यान्ह भोजन, दैनिक परिपाठ व विविध सहशालेय उपक्रम राबवण्यासाठी अमास सेवा ग्रुप मुंबई यांच्या तर्फे साडे तीन हजार स्क्वेअर फुटाचे भव्य पत्र्याचे शेड बांधले. त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेवक अग्रवाल यांच्या तर्फे शाळेस एक वर्गखोली बांधून घेतली, त्याचबरोबर ग्रामपंचायत कडून एक वर्गखोली बांधून मिळवली. याच बरोबरओसाट या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून शाळेस चार वर्गखोल्या, मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, किचन विथ स्टोअर रूम यासाठी पंच्याहत्तर लाख रुपये निधी मंजूर करून घेतला व त्याचे बांधकाम पूर्ण केले. याचबरोबर शाळेस पाणीपुरवठा, संगणक संच, अँड्रॉइड टी व्ही, संगीत साहित्य, क्रीडा साहित्य व इतर बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या एनजीओ कडून व दानशूर व्यक्तीकडून मिळवल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेत मुलींचा प्रथम क्रमांक पटकावला. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडपणे चालू राहावे यासाठी ओट्यावरची शाळा, भिंतीही बोलू लागल्या असे विविध उपक्रम राबविले. याची दखल ‘भयकाळातील झुंज ‘ या पुस्तकात घेतली गेली. व त्यांचा लेख प्रसिद्ध केला.या विविध उपक्रमासाठी त्यांना शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, विस्तार अधिकारी वंदना चव्हाण,मुख्याध्यापक महादू वाणी यांचे मार्गदर्शन लाभले व शाळेवरील सर्व सहकारी शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ज्ञानेश्वर कोकणे यांना नेशन बिल्डर अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.