
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर: राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा येत्या नोव्हेंबर महिन्यात देगलूर येथे दाखल होणार आहे. तत्पूर्वी दिवाळीचा उत्सव पार पडणार आहे. दीपोत्सवानिमित्त आणि भारत जोडो यात्रेनिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माचरे यांनी दिली आहे.
देगलूर पोलीस ठाण्यांतर्गत दीपोत्सवाचा आनंद नागरिकांना सुरक्षित राहून घेता यावा यासाठी देगलूर पोलीस दक्ष आहेत. नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन चोरटे मौल्यवान वस्तू पळवू नयेत यासाठी बाजारपेठेत पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. रात्रीची गस्तही तैनात करण्यात आली आहे. याशिवाय अनेक उपाययोजनाही करण्यात येत आहेत. त्यामुळेनांदेडकरांनी बिनधास्तपणे दिवाळीचा आनंद लुटावा, असे आवाहन करतांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दि. ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथे दाखल होणार आहे. या यात्रेच्या बंदोबस्तासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते नियोजन केले जात आहे. या अनुषंगाने चाचपणी करण्यात आली आहे, अशी माहितीही पोनि माचरे यांनी दिली आहे. दरम्यान, ठाण्यांतर्गत अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी देगलूर पोलीस अनेक कारवाया करीत आहेत. बेशिस्त वाहतूक, गावठी दारू, गुटखा विक्री याला पायबंद घालण्यासाठी धडाकेबाज कारवाई करण्यात येणार आहे. सर्वसामान्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देतांनाच गुन्हेगारांना कायद्याने चपराक देण्यासाठीही प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.