
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:राज्य सरकारकडून दिवाळी निमित्त प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनेत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सुमारे एक कोटी 62 लाख शिधा वाटप पत्रिका लाभार्थ्यांमधील तब्बल सात कोटी नागरिकांना याचे वाटप करण्यात येणार आहे. परंतु दिवाळी सुरु झालेली असली तरी अद्यापही या आनंद शिधाचे वाटप झालेले नाही. त्यामुळे आता ऑनलाईन पद्धतीने वाटप करण्यात येणाऱ्या या शिधाचे वाटप हे ऑफलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. यामुळे आता लाभार्थ्यांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल या चार वस्तू लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून देण्यात आली आहे.आनंदाचा शिधा हा सध्या राज्यभर ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्याचे काम सुरु होते. परंतु ऑनलाईन पद्धतीने सुरु असलेले हे वितरणाचे काम खूप ‘संथगतीने सुरु असल्याने याबाबत तातडीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला. आनंदाचा शिधा ऑफलाईन पद्धतीने वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्यानंतर अन्न, नागरी व पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.
दिवाळीच्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या या शिधेसाठी पात्र शिधापत्रिका धारक हे त्यांच्या नेहमीच्या रेशनिंग दुकानात जाऊन आनंदाचा शिधा मिळवू शकतात. यासाठी पात्र धारकांनी त्यांचे नाव नोंदणी असलेल्या रेशनिंग दुकानात जाऊन याचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्री राजेंद्र चव्हाण यांच्याकडून करण्यात आले आहे. परंतु ज्या विभागामध्ये ऑनलाईन पद्धतीने सुरळीत याचे वाटप होत आहे त्या रेशनिंग दुकानदारांनी त्याच पद्धतीने याचे वाटप करावे, अशी माहिती देखोली रवींद्र चव्हाण यांच्याकडून देण्यात आली आहे.