
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांच्या तक्रारीनुसार अमरावती येथील राजापेठ पोलिसांनी अपक्ष आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. बच्चू कडू हे खोके मिळाल्यानंतरच गुवाहाटीला गेले होते, असा सनसनाटी आरोप रवी राणा यांनी केला होता.
त्यानंतर माझी बदनामी झाल्याचे म्हणत कडू यांनी राणांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली होती.
राज्यातील खोके सरकारचे समर्थक असलेले बच्चू कडू आणि रवी राणा हे दोन आमदार गेले काही दिवस एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यातच ‘बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार आहे. खोके मिळाल्यानंतरच तो गुवाहाटीला गेला होता,’ असा एकेरी उल्लेख करत राणा यांनी आरोप केल्याने या दोघांमधील वाद विकोपाला गेला. कडू यांनी थेट राणा यांच्याविरुद्ध राजापेठ पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. त्याआधारे आज राणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आहे. रवी राणा यांचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. गुवाहाटीला जाण्यासाठी मी पैसे घेतले, असे ते म्हणत असतील तर त्याचे पुरावे त्यांनी द्यावेत. मी तोडपाणी केल्याचे सिद्ध झाले तर मी त्यांच्या घरी भांडी घासायलाही तयार आहे. त्यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्यावे अन्यथा लढाई आरपारची होईल. मी कायदेशीर मार्ग अवलंबेन, असे कडू म्हणाले होते. मी पैसे घेऊन गुवाहाटीला गेलो असेन तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या आरोपाला उत्तर द्यायला हवे. याबाबत मी त्यांना नोटीस पाठवणार आहे, असेही कडू म्हणाले होते.
——————————–
गुन्हा दाखल झाल्यानंतर राणा यांनीही प्रतिक्रिया दिली. ‘माझ्यावर खालच्या भाषेत टीका केली गेली. मला शिवीगाळ करण्यात आली. या लोकांना मी सोडणार नाही. माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले तर मीही त्यास जशास तसे उत्तर देईन, असे राणा म्हणाले. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे म्हणणे मी ऐकेन असेही त्यांनी सांगितले.
———————————