
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप-मनसे आणि शिंदे गट अशी थेट लढत होऊ शकते. दिवाळी गाठीभेटींच्या निमित्तानं निवडणुकांची रणनीती ठरत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीसांनी मनसेच्या दीपोत्सवाला हजेरी लावली, दीपोत्सवाचं उदघाटन केलं. त्यानंतर राज ठाकरे यांच्यासोबत शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन अनौपचारिक गप्पाही मारल्या.
त्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांनी सहकुटुंब अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थावर शर्मिला ठाकरेंनी श्रीकांत यांच्या पत्नी वृशाली यांचं औक्षण केलं. गणेशोत्सवापासूनच राज-फडणवीस, राज-शिंदे भेटींचा सिलसिला सुरु झालाय, तो दिवाळीतही कायम राहिलाय. अंधेरी निवडणूक लढवू नका असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आणि भाजपनं माघार घेतली. त्यामुळे भाजप-मनसे-शिंदे जवळीक वाढल्याचं दिसतंय.
मुंबईत उद्धव ठाकरेंना शह द्यायचा असेल तर मनसे आणि शिंदे गट दोघेही सोबत असणं आवश्यक असल्याचं भाजपच्या एका गटाला वाटतं. भविष्यात काहीही होऊ शकतं असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आधीच केलंय. जानेवारी फेब्रुवारी अखेरीस राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
डिसेंबर अखेर महायुतीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-मनसे-शिंदे गटाच्या महायुतीत थेट सामना रंगण्याची शक्यता आहे.